वनभोजनाची हौस येऊरच्या मुळावर

वनभोजनाची हौस येऊरच्या मुळावर
Published on

ठाणे शहर, ता. १७ (बातमीदार)ः उन्हाचा पारा वाढल्याने जीवाची काहिली होऊ लागली आहे. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी अनेकांची पावले वळू लागली आहेत. ठाणेकरांनीदेखील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरचा आधार घेतला असून, सुट्टीच्या दिवशी वनभोजनाच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. त्यासाठी जंगलातच चुली पेटवण्यात येत असल्याने वणवा लागण्याचा धोका वाढला आहे.
ठाणे, मुंबईकरांसाठी आकर्षणाचे ठिकाण म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे पाहिले जाते. उद्यानात बिबटे, हरीण, ससे, कोल्हे, मुंगूस अशा वन्यजीवांचा वावर असून, विविध पक्ष्यांचा अधिवास आहे. पण येऊर परिसरातील बंगले संस्कृती तसेच पर्यटनाच्या नावाखाली हौशी माणसांची वर्दळ वाढल्याने विविध अडचणी उद्भवत आहेत. यात प्रामुख्याने सुट्टीच्या दिवशी पार्टी करण्याकरिता येणारे घोळके त्रासदायक ठरत आहेत. आदिवासींचे काही पाडे जंगलात असल्याने वनभोजनाचे बेत येथे आखले जात आहेत. रविवार तसेच सरकारी सुट्टीची दिवशी हौशी लोक जंगलात चुली पेटवून चिकन-मटणाच्या पार्ट्या करीत आहेत. त्यामुळे चुलीवरच्या जेवणामुळे जंगलात वणवा लागण्याचा धोका वाढला आहे.
-------------------------------------
पर्यटकांमुळे प्रदूषणात वाढ
येऊर गावातील दुकानांमधून लागणारा किराणा, मिरची, तेल, मसाले मिळत असून पाड्यांमध्ये गावठी कोंबडे आणि बोकडांचीसुद्धा व्यवस्था होते. जेवण बनवणारे आदिवासी स्वयंपाकीदेखील येथील गावपाड्यांत मिळतात. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करून वनभोजनाचा आनंद घेणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. या हौशी पर्यटकांच्या पार्ट्यांमुळे बाटल्या, पत्रावळ्या, प्लॅस्टिकचा कचरा होत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.
----------------------------------------------
येऊरला जाणाऱ्या वाहनांची मुख्य गेटवर तपासणी केली जाते. लोकांना दारू घेऊन जाण्यास मनाई आहे. वनभोजनाला बंदी असून, असे प्रकार करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाईदेखील केली जात आहे.
- मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com