वाशीत विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापना धडे

वाशीत विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापना धडे

Published on

वाशीत विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाचे धडे
वाशी, ता. १७ (वार्ताहर) : मास्टेक आणि ग्रामीण प्रगती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १७ मार्च रोजी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक २८, वाशी येथील विद्यार्थ्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या वेळी ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे सीईओ मंगेश डाफळे यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले.
नवी मुंबई महापालिका ही राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात स्वच्छ महापालिका म्हणून ओळखली जाते. तरीही नागरिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबत अद्याप अनास्था असल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबत जागृती व्हावी आणि आपल्या आसपासचा परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवण्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग लाभावा, याकरिता ही जनजागृती मोहीम राबविण्यात आल्याचे मंगेश डाफळे यांनी सांगितले. यासाठी महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्यास त्यांचे अनुकरण करून त्यांचे पालक आणि समाजातील घटक यांच्यातही घनकचरा व्यवस्थापनाची भवना जागरूक होईल. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे डाफळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि घनकचऱ्याचे महत्त्व पटवून देत असताना एकल वापराच्या प्लॅस्टिकचा आणि टिशू पेपरचा वापर पर्यावरणासाठी घातक असून, त्याचा वापर पूर्णपणे बंद करणे गरजेचे असल्याचे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. या वेळी भविष्यकाळात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागरूक राहावे म्हणून कचरा व्यवस्थापन करताना कचऱ्याचे ओला, सुका असे वर्गीकरण करून कचऱ्याचा कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्निर्माण या प्रक्रियांचा अवलंब करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. या वेळी फाउंडेशनतर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि व्यवस्थापकांचे फाउंडेशनतर्फे आभार मानण्यात आले. मास्टेक फाउंडेशन आणि ग्रामीण प्रगती फाउंडेशन हे गेल्या वर्षभरापासून नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करीत आहेत. यात त्यांना दोन्ही महापालिकांचीही साथ लाभली आहे. यासोबतच बस आणि रेल्वे स्थानके, विविध रहिवासी संकुलांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व सांगण्याचे काम मास्टेक फाउंडेशन आणि ग्रामीण प्रगती फाउंडेशनतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com