छत्रपतींच्या जयजयकाराने ठाणे दुमदुमले

छत्रपतींच्या जयजयकाराने ठाणे दुमदुमले

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ‘जय भवानी..., जय शिवाजी..., छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ अशा गगनभेदी घोषणा देत ठाणे शहरासह जिल्ह्यात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करत भव्य मिरवणुकाही काढण्यात आल्या. अनेक ठिकाणी यानिमित्त भगव्या पताका, भगवे झेंडे लावण्यात आले. छत्रपतींची शौरवगाथा सांगणाऱ्या पोवाड्यांनी यामध्ये आणखी स्फूर्ती आणली. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने भिवंडी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपतींच्या मंदिराचे लोकार्पण झाले, तर डोंबिवलीत महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले.

प्रथेप्रमाणे ठाणे महापालिकेने यावर्षीही तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. यानिमित्ताने महापालिकेने मिरवणुकीचे आयोजन केले होते. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक तलाव पाळी, टेंभी नाका, कोर्ट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंगो बापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली. या मिरवणुकीत, घोडेस्वार, लेझीम पथक, शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणारी पथके, बॅण्ड आदींचा समावेश होता. मिरवणुकीदरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी मान्यवर उत्सवात सहभागी झाले.

कोर्ट नाका येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टेंभी नाका येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. मिरवणुकीची सांगता तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली.

ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाकडूनही मासुंदा तलाव येथील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. माजी खासदार राजन विचारे यांच्यासह ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या भगव्या साडी परिधान करून आल्याने संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com