

जे. जे. रुग्णालयाला कायमस्वरूपी अधिष्ठाता कधी?
डॉ. अजय भंडारवार यांना अतिरिक्त पदभार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्य सरकारचे सर्वात प्रमुख रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या जे. जे. रुग्णालयाला आता कायमस्वरूपी अधिष्ठाता मिळणार कधी, असा प्रश्न पडला आहे, कारण कोविड काळानंतर अधिष्ठातापदावर रुजू झालेल्या डॉ. पल्लवी सापळे यांनी अखेर वैद्यकीय सहसंचालकपदाचा स्वीकार केला असून, त्या पदावर कार्यरत झाल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीचा आदेश २२ जानेवारी २०२५ या रोजीच काढण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सापळे जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत होत्या.
१७ मार्च रोजी नव्याने काढलेल्या आदेशानुसार डॉ. पल्लवी सापळे या सहसंचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय पदावर रुजू झाल्या आहेत. आता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अतिरिक्त कार्यभार शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आल्याचे शासन नियमात सांगण्यात आले आहे. डॉ. अजय भंडारवार यांंना स्वतःच्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सांभाळून ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जे. जे. रुग्णालयात ओपीडीमध्ये दररोज सुमारे तीन हजार रुग्ण उपचारांसाठी येतात. त्याचप्रमाणे ३०० ते ४०० रुग्ण दाखल होत असून, सुमारे १३० रुग्णांवर दररोजच्या छोट्या-मोठ्या एकत्रित शस्त्रक्रियाही केल्या जातात. हे मुंबईतील राज्य सरकारद्वारे चालवले जाणारे सर्वात मोठे रुग्णालय आहे. त्यामुळे येथे केवळ मुंबईतूनच नव्हे, तर महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून रुग्ण उपचारांसाठी येतात. यासह आरोग्य कर्मचारी आणि निवासी डॉक्टरांचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी वर्तन चांगले नसते. अनेक प्रकरणांमध्ये विविध विभागांचे डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत. अनेकदा रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागतात. अशा परिस्थितीत रुग्णालयाच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत, शिवाय रुग्णालयातील अधिष्ठाता हे पद अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे जे. जे. रुग्णालयाला कायमस्वरूपी अधिष्ठाता कधी मिळतील, असा सवाल विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.