रायगडच्या बातम्या

रायगडच्या बातम्या
Published on

क्रिएटिव्ह क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञान शिबिर
पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील क्रिएटिव्ह क्लबच्या वतीने शाळेत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फोटोग्राफी, फोटोज, एडिटिंग, व्हिडिओ करण्यासंदर्भातील टास्क यासह फनी गेम, व इतर ॲक्टिव्हिटीज आदी तंत्रज्ञान आताच्या मुलांना येणे गरजेचे असल्याने याकरीता डिजिटल तंत्रज्ञानाबरोबर फोटोग्राफीशी जोडणी कशी करावी, यासंदर्भातील माहिती या क्लबच्या वतीने देण्यात आली. यावेळी संस्थेचे मीडिया प्रमुख कृष्णा पवार, तालुकाप्रमुख काशीराम निरगुडे, मनीषा तांडेल, रिया लोखंडे, सिया लोखंडे आदी उपस्थित होते. या शिबिरात तालुक्यातील १५ गावांमधील ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
..................
वाढत्या उष्म्यामुळे रोहेकर हैराण
रोहा (बातमीदार) ः यंदा मार्चमध्येच उष्णतेच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याने रोहेकर हैराण झाले आहेत. दरवर्षी मार्चच्‍या सुरुवातीला पहाटे व रात्रीच्या सुमारास वातावरणात थोड्याफार प्रमाणात थंडी जाणवत असे. त्यामुळे दिवसाही ब-यापैकी वातावरणात थंडावा असत. परंतु या वर्षी मात्र परीस्थिती पूर्णपणे बदलली असून वातावरणात एकाकी उष्णतेच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. सद्यास्थितीत आकाश पूर्णपणे निरभ्र असल्याने सूर्याची किरणे थेटपणे जमिनीवर पोहचत असून कमालीची उष्णता जाणवू लागली आहे. त्यामुळे मानवासह इतर सजीव सुष्टीही हैराण झाली आहे. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात मुक्‍या जनावरांना झाडांच्या सावलीत बांधण्यात येत आहे. गत वर्षीपेक्षा या वर्षी उष्णता लवकरच व मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने त्याचे दृश्य परिणामही दिसू लागले आहेत. मागील १५ दिवसात राज्यात काही ठिकाणी अवकळी पावसाने हजेरी लावल्याने त्याचाही परिणाम म्हणून सर्वत्र अधिक उष्णता जाणवू लागली आहे. तर उष्णतेपासून बचाव व्हावा, याकरिता दुपारच्या सुमारास शक्यतो घराबाहेर पडण्याचे टाळा, जेणेकरून होणारा त्रास हा कमी प्रमाणात असेल अशाप्रकारचा सल्ला डॉक्टर मंडळींकडून दिला जाऊ लागला आहे.
.............
पेणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
पेण (वार्ताहर) : पेण तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी १७ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच किल्ले रायगडवरून आलेली शिवज्योत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गावागावात नेण्यात आली. तर यावेळी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून रथामध्ये मोठी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत घोडे, ढोलताशे, लेझीम तसेच फटाक्यांची आतषबाजी पाहावयास मिळाली. या मिरवणुकी दरम्यान नाचणारा घोडा पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर यावेळी पेण, अलिबाग, कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. ही मिरवणूक संपूर्ण पेण शहरात फिरविण्यात आली. या मिरवणुकीत शिवसेना जिल्हा सहसमन्वयक समीर म्हात्रे, शहर प्रमुख सुहास पाटील, नरेश गावंड, तुकाराम म्हात्रे, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, वैशाली समेळ, मेघना चव्हाण, अरुणा पाटील, कांतीलाल म्हात्रे, नरेश भालेराव, नामदेव पिंगळकर, रवींद्र पाटील आदीसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
................
श्रीवर्धन येथे शिवजयंती उत्साहात साजरी
श्रीवर्धन (वार्ताहर) ः शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. १९७९ पासून श्रीवर्धन येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली जाते. मधल्या कालावधीत शिवजयंती महोत्सव समिती मार्फत मिरवणूक काढली जात असत. कालांतराने काही वर्षे श्रीवर्धन नगरपरिषदेकडून मिरवणुकीचे नियोजन करण्यात येत असे. परंतु काही कारणास्तव मिरवणुकीची धुरा पुन्हा शिवजयंती महोत्सव समितीकडे सोपविण्यात आली. काही वर्षे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी शिवजयंती मिरवणूक काढली जात असत. परंतु समितीकडून मिरवणुकीच्या बाबतीत बदल करण्यात आला व तिथीनुसार शिवजयंती मिरवणूक काढण्यात येऊ लागली. श्रीवर्धन येथील शिवभक्तांनी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी किल्ले रायगड येथे मध्यरात्रीच्या सुमारास पेटती मशाल हाती घेत ८६ किलोमीटरचे अंतर पोवाडे व ढोलांच्या गजरात रस्त्याने धावत पार केले. प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशालीचे आगमन झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते मशाल पूजन, ध्वजारोहण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मशाल श्रीवर्धन गावात फिरवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com