पालघरमध्ये घरकुल योजनेच्या ९९ टक्के प्रस्तावांना मंजुरी

पालघरमध्ये घरकुल योजनेच्या ९९ टक्के प्रस्तावांना मंजुरी
Published on

पालघर, ता. १८ (बातमीदार) : जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ग्रामीणअंतर्गत ६० हजार ९१४ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ६० हजार १९२ प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आली. म्हणजेच एकूण प्रस्तावांपैकी ९८.८१ टक्के अर्जांना मंजुरी देण्यात आली. वसई आणि तलासरी तालुक्यातील सर्वाधिक १०० टक्के प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घरकुल लाभार्थी संवाद अभियान’ राबवले जाणार आहे. ‘स्वप्न घरकुलाचे, साथ शासनाची’ या ध्येयाने प्रेरित हे अभियान २० मार्चला सर्व तालुक्यांमध्ये एकाचवेळी आयोजित केले जाणार आहे. या मोहिमेद्वारे लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्वरित निराकरण करणे आणि घरकुल पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. तसेच, पूरक योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मदत करण्यात येणार आहे.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. २० मार्च रोजी राबवण्यात येणाऱ्या या विशेष अभियानामुळे घरकुल बांधणीला अधिक गती मिळेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

गावपातळीवर साहित्यविक्रेत्यांची यादी
प्रत्येक अधिकाऱ्याने गुगल फॉर्मद्वारे लाभार्थ्यांच्या भेटीची नोंद करणे आणि सेल्फी अपलोड करणे अनिवार्य असेल. अभियानादरम्यान सुरू नसलेल्या घरकुलांची पाहणी करून भूमिपूजन करण्यात येणार आहे. गावपातळीवर घरकुल बांधणीसाठी आवश्यक साहित्यविक्रेत्यांची यादी तयार करण्यात येईल. तसेच लाभार्थी कुटुंबांतील महिलांना उमेद अभियान व अन्य रोजगार योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांनी दिली.

समाजमाध्यमांचा वापर होणार
लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचावी, यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर लाभार्थ्यांचे व्हॉट्सॲप गट तयार करण्यात येणार असून, अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसोबत घेतलेल्या संवादाची छायाचित्रे आणि माहिती संकलित करणे बंधनकारक असणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रशासनाने हे अभियान हाती घेतले आहे. योजनांची अंमलबजावणी गतीने व पारदर्शकपणे करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
- भानुदास पालवे,
मुख्य कार्यकारी अधिकारी

तालुकानिहाय अर्जांची आकडेवारी
तालुका प्रस्ताव मंजूर अर्ज टक्केवारी
डहाणू १५,९७६ १५,६५३ ९७.९८
जव्हार ११,६९४ ११, ५८८ ९९.०९
तलासरी ५,०१४ ५,०१४ १००
वसई १,१३१ १,१३१ १००
विक्रमगड ८,४८६ ८,३७५ ९८.५५
वाडा ६,८०३ ६,७७८ ९९.६२
मोखाडा ५,७९१ ५,७०६ ९८
पालघर ६,०१८ ५,९६० ९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com