

टोकावडे, ता. १८ (बातमीदार)ः मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारातील मंगळवारचा आठवडा बैलबाजार ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. या बैलबाजारात नाशिक, बेल्हा, इगतपुरी, कर्जत, शहापूर, जुन्नर, ओतूर, आळेफाटा येथील शेतकरी विविध प्रकारच्या जनावरे विक्रीसाठी येत असतात, परंतु काही दिवसापासून आठवडा बाजारातील जनावरांची आवक मंदावल्यामुळे खरेदी-विक्रीही मंदावली आहे.
सरळगाव येथील आठवडा बाजारामध्ये बैल, म्हशी, रेडे, बकरी यासारख्या प्राण्यांच्या खरेदी-विक्री कमी प्रमाणात होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध जनावरांची येथे विक्री होत होती, पण मंगळवारी ५० ते ६० म्हशी, रेडे विक्रीसाठी आले होते. शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
-----------------------------------------------------------
बैलजोडी सांभाळणे कठीण
आधुनिक तंत्रज्ञानामुळे बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरलाच पसंती दिली जात आहे. तसेच चारा वाढल्याने बैलजोडी सांभाळणे कठीण झाले आहे. तसेच बैलाची देखभाल करण्यासाठी प्रतिदिवस ४०० ते ५०० रुपयांची मजुरी द्यावी लागते. त्यामुळे बैल सांभाळणे खर्चिक झाले आहे, तर बैलगाडा शर्यतींमुळे हौशी लोक खरेदी करत असल्याने बैलांच्या किमती अवाच्या सव्वा वाढल्या आहेत. त्यामुळे सरळगावातील जनावरांची खरेदी-विक्रीही मंदावल्याचे चित्र आहे.
----------------------------------------------------------------------
उन्हाचा बाजार समितीला तडाखा
यापूर्वी ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये बाजारात लाखोंची खरेदी-विक्रीची उलाढाल होत होती. काही वर्षांपूर्वी सरळगाव आठवडा बाजारामधून मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न १७ ते १८ लाख होत होते. आता मात्र वार्षिक उत्पन्न ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे बाजार समितीचे सचिव दशरथ भगत यांनी सांगितले. अशातच उन्हाच्या तडाख्याने खरेदी-विक्री कमी होत असल्याने मंदीचा फटका बाजार समितीला बसत आहे.
---------------------------------------------------------
सध्याच्या काळात अनेक जण ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करतात. त्यामुळे सरळगाव बाजारामध्ये बैल जोडीची खरेदी-विक्री कमी होत चालली आहे. त्याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावरही झाला आहे.
-बाळकृष्ण चौधरी, सभापती, बाजार समिती, मुरबाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.