फेरीवाला समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

फेरीवाला समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Published on

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या फेरीवाला समितीच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निवडणूक घेण्यासाठी कामगार आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. कामगार आयुक्तांनी याआधी नियुक्त केलेला निवडणूक निर्णय अधिकारी मिरा-भाईंदर महापालिकेत फिरकलाच नव्हता. त्यामुळे निवडणूक रखडली होती.

मिरा-भाईंदर शहरात फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या सर्व फेरीवाल्यांना महापालिकेने ओळखपत्र देऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा देणे आवश्यक आहे, परंतु त्यासाठी फेरीवाला धोरण निश्चित होणे गरजेचे आहे व हे धोरण निश्चित करण्यासाठी फेरीवाला समितीची स्थापना व्हायला हवी. या समितीत फेरीवाल्यांमधून १२ सदस्यांची निवडणुकीद्वारे निवड करायची आहे. ही निवडणूक घेण्यासाठी कामगार आयुक्तांनी गेल्यावर्षी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती, मात्र हा अधिकारी महापालिकेत फिरकलाच नाही. त्यामुळे फेरीवाला समितीची निवडणूक गेल्या आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ रखडली. अधिकारी बदलून मिळावा, यासाठी महापालिकेने कामगार आयुक्तांना पत्रदेखील दिले होते. त्यानंतर आता कामगार आयुक्तांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांची नियुक्ती केली आहे. हा अधिकारी सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांमधून १२ सदस्यांची निवडणुकीद्वारे पाच वर्षांसाठी निवड करणार आहेत.

प्रशासन अडचणीत
शहरातील अनेक रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. हे फेरीवाले वाहतुकीला मोठे अडथळे ठरत आहेत, तसेच नागरिकांना रस्त्यावरून, पदपथावरूनही चालणे अशक्य होऊन बसले आहे, मात्र फेरीवाल्यांवर कारवाई करायची झाली तर फेरीवाला संघटना आधी फेरीवाला धोरण निश्चित करा, असा आग्रह धरतात. फेरीवाला समितीची स्थापना होत नाही, तोपर्यंत धोरण ठरविणे महापालिकेला अवघड बनले आहे. त्यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे.

अधिकृत ओळखपत्र मिळणार
फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार शहरात फेरीवाल्यांची संख्या आठ हजार ९२७ आहे. फेरीवाला धोरणांतर्गत त्यांना अधिकृत ओळखपत्रे देऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा निश्चित करून द्यायची आहे. हे अधिकार फेरीवाला समितीला असल्याने फेरीवाला समितीची स्थापन होणे आवश्यक आहे. या समितीत अन्य नियुक्त सदस्यांव्यतिरिक्त बारा सदस्य सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांमधून निवडणुकीद्वारे समितीवर नियुक्त करायचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com