

उन्हाळी शेतीतून आर्थिक स्रोत
मसद येथील शेतकऱ्याची यशस्वी कामगिरी; टरबूज, भाजीपाल्यातून उत्पन्न
पेण, ता. १८ (वार्ताहर) : तालुक्यातील मसद गावचे सरपंच तसेच प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र पाटील यांनी उन्हाळी टरबूज आणि भाजीपाल्याची लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढले आहे. त्यामुळे त्यांनी यशस्वी उन्हाळी शेतीतून उत्पनाचे नवे आर्थिक स्रोत निर्माण केले आहे.
तालुक्यामध्ये पाणीटंचाई असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी पावसाळी पिकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे वर्षाच्या इतर महिन्यात दुसरा जोडधंदा केला जातो किंवा नोकरीच्या शोधात इतर तालुक्यात जावे लागते, मात्र मसद येथील शेतकरी हरिश्र्चंद पाटील यांनी यशस्वी उन्हाळी शेतीतून चांगले उत्पन स्रोत निर्माण केल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या शेतीमध्ये दीड एकरात भाजीपाला लागवड आणि याच बरोबरीने सात गुंठ्यांत टरबूज लागवडीचा नवीन प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे तलावाच्या पाण्यावर टरबूज, भाजीपाल्याचे चांगले उत्पादन त्यांनी मिळवले आहे. त्यांचा हा नावीण्यपूर्ण शेती पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. एकतर या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई असूनही अशा खारभूमी क्षेत्रात हा प्रयोग पाटील यांनी यशस्वी करून दाखविला आहे. यासाठी त्यांना वनराई संस्था व जेएसडब्ल्यू फाउंडेशनकडून मदत मिळाली आहे. त्यांना संस्थेकडून भाजीपाला शेती, टरबूज लागवडीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. एका भागात जागेच्या प्लॉटनुसार कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, मिरची, शिराळी, भाजीपाला लागवड आणि याचबरोबरच टरबूजची शेती अशा पद्धतीने ही लागवड करण्यात आली आहे.
...................................
मसद बेडी हे ठिकाण धरमतर खाडीकिनारी लगतचे खारभूमी क्षेत्र आहे. या ठिकाणी नावीण्यपूर्ण शेती करण्याचा गेल्या १० वर्षांपासून अनुभव आहे. वनराई आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांनी नावीण्यपूर्ण भाजीपाला शेती व टरबूज फळशेती याबाबत माहिती मार्गदर्शन केले. त्याचा फायदा होऊन आता भाजीपाला आणि टरबूज अशी उत्पादन तयार होऊन या परिसरात एक नावीन्यपूर्ण उन्हाळी शेतीचा प्रयोग पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीसुद्धा उन्हाळी लागवड करून आर्थिक उत्पन्न स्रोत निर्माण करावे, असे हरिश्र्चंद पाटील यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.