

ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार) : नागरिकांची सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी खेड्या-पाड्यांतील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचे काम ठाणे ग्रामीण पोलिसांनी हाती घेतले आहे. जिल्हाभरात साडेचार हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरवून सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण पोलिसांकडून नागरी सहभागातून एक हजार १२१ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले. पोलिस प्रशासनाकडून कोणताही खर्च न करता लोकांच्या सहभागातून सुरू करण्यात आलेला राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
ठाणे ग्रामीण पोलिसांची हद्द दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत असल्याने ग्रामीण भागाला सुरक्षा पुरवणे मोठे आव्हान आहे. सुमारे १५०० पोलिस बंदोबस्तावर असताना आता त्यांनी सुव्यवस्थेचे आव्हान स्वीकारत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे उभे राहणार आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. एस. स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागाची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी अधीक्षक कार्यालयातून जिल्ह्यातील घडामोडींवर थेट वॉच ठेवता यावा, याकरिता ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अन्य अधिकारी उपस्थित होते.
खासगी
ग्रामीण भागातील खासगी, शासकीय, निमशासकीय ठिकाणी भेटी देऊन पोलिसांनी तेथील कार्यान्वित सीसीटीव्ही यंत्रणा नियंत्रण कक्षाला जोडली आहे. त्यासोबतच महामार्ग, ज्वेलर्स, हॉटेल्स, गोडाऊन, ग्रामपंचायत, सोसायटी, पेट्रोलपंप, घराबाहेरील कॅमेरे, शाळा, एसटी स्थानक, रिसॉर्ट असे सारे भाग पोलिसांच्या नजरेत घेतले आहेत. सध्या सीसीटीव्ही कक्षाशी एक हजार १२१ ऑनलाइन कॅमेऱ्यांची जोडणी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी केली आहे. त्यामुळे तेथील सर्व परिसर ग्रामीण अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये २४ तास लाइव्ह दिसतो. लवकरच साडेचार हजार कॅमेऱ्यांचा टप्पा पार केला जाईल, असे अधीक्षक डॉ. स्वामी यांनी सांगितले.
‘एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षेसाठी’
तपासकामी सीसीटीव्ही यंत्रणा पोलिसांसाठी मदतगार असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. या यंत्रणेमुळे तपास कामाला वेग आणि यश येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या यंत्रणेचे जाळे जिल्हाभर पसरावे, या हेतूने लोकांच्या मदतीने काम सुरू केले आहे. त्यासाठी काही दिवसांपासून जिल्हाभर सर्व्हे सुरू होता. गावकरी, सरपंच, दुकानदार, पोलिस पाटील यांच्या भेटी घेऊन ‘एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षेसाठी’ या उपक्रमाची माहिती त्यांना देण्यात येत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.