चिऊताई ये ना गं माझ्या अंगणी...

चिऊताई ये ना गं माझ्या अंगणी...
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : लहानपणापासून सर्वांच्या मनात घरटे करून बसलेल्या चिऊताईचा चिवचिवाट आता हरपत चालला आहे. हा चिवचिवाट वाढावा आणि चिऊताईला क्षणभर विश्रांतीसाठी घरटे मिळावे, तिला दाणा-पाणी मिळावे, यासाठी ठाण्यातील चिमुकले हात सरसावले आहेत. टाकाऊ वस्तूंपासून चिऊताईसाठी घरटे बनवताना त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. निमित्त होते, जागतिक चिमणी दिवसनिमित्त स्पॅरोताई फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय चिमणी संवधर्न स्पर्धेचे. ठाण्यातील टिकूजिनी वाडी येथील निसर्गरम्य ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबईतील ५० शाळांनी सहभाग नोंदवला होता.

स्पॅरोताई फाउंडेशनतर्फे डॉ. राज आणि डॉ. ज्योती परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ या मोहीमअंतर्गत ही स्पर्धा पार पाडली. ‘माझ्या चिऊताईसाठी घरकुल’ अथवा ‘माझ्या चिऊताईसाठी फिडर बनविणे’ अशा सांघिक स्वरूपाच्या स्पर्धा इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या होत्या. तसेच विद्यार्थांमध्ये चिमणीबद्दल जागरूकता वाढावी, यासाठी प्रश्नमंजुषेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त बक्षिसे वाटण्यात आली. त्यामुळे एकूणच स्पर्धेचे वातावरण चिमणीमय झाले होते.

सांघिक स्पर्धा असल्याने प्रत्येक जण आपल्या ग्रुपसोबत होते. पिशवीतून कोणी बाटली काढत होते, तर कुणी गवत, करवंटी, पुठ्ठे, झाडांची खुड... आपण असं करू, तसे सजवू असे म्हणंत प्रत्येक ग्रुपची मुले चिऊताईचे घरटे बनवण्यात आणि सजवण्यात दंग झाली होती. प्रत्येकाने आपल्या कल्पनेप्रमाणे घरटी बनवली. चिऊताईला आतबाहेर करता येईल. तिला सहज दाणा-पाणी मिळेल, याची काळजी मुले घेत असताना पाहायला मिळाली. त्यामुळे काही तासांतच चिमण्यांसाठी घरटी तयार झाली. त्यामुळे या स्पर्धेला जितका वेळ लागला नाही, तितका वेळ कोणते घरटे सर्वोत्तम आहे, हे ठरवण्यात संजय काशीद आणि उर्मिला शिंपी या परीक्षकांना लागला.

जंगलातही लावले फिडर
समूह स्पर्धा असल्याने विद्यार्थी घरटी आपआपल्या घरी घेऊन गेले, पण काही फिडर जंगलात ठेवण्यात आले. किमान १५ दिवस त्यांच्या दाण्याची सोय होईल, असे डॉ. ज्योती परब यांनी सांगितले. तसेच आम्ही दोन तरी चिमण्या वाचवणारच, त्यांच्यासाठी घरात दाणा-पाण्याची सोय करणार आणि आमच्या मित्रांनाही प्रेरित करणार, असा संकल्प घेत मुले घरी परतल्याचे परब यांनी सांगितले. या मोहिमेला प्रणाली गिरी, रुची पारकर, कश्मिरा पाताडे, सुवर्णा कांबळी, सारिका वायाळ, दिपश्री गावडे, साक्षी परब यांचे सहकार्य लाभले.

विजयी स्पर्धक
घरटे स्पर्धा : ज्ञानोदय विद्यामंदिर हिंदी माध्यम (प्रथम क्रमांक), श्री इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज (द्वितीय), हरिओम इंग्लिश स्कूल (तृतीय)

माझ्या चिऊताईसाठी फिडर स्पर्धा : यशोधन इंग्लिश स्कूल (प्रथम), श्रीमती सावित्री देवी थिरानी विद्यामंदिर (द्वितीय), रामकृष्ण विद्यामंदिर (तृतीय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com