रबाळे पोलिसांकडून अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई;

रबाळे पोलिसांकडून अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई;
Published on

अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई
६६ कर्जदारांचे सह्या घेतलेले कोरे स्टॅम्प पेपर, कोरे चेक जप्त


नवी मुंबई/वाशी, ता. १८ (वार्ताहर) : रबाळे पोलिसांनी घणसोली येथील परवानाधारक सावकार भाऊ सावंत यांच्यावर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सावंत यांना नियमानुसार एक टक्का व्याज आकारण्याची परवानगी आहे; मात्र त्यांनी सोनल प्रमोद शिंदे यांच्याकडून १० टक्के दराने म्हणजेच वार्षिक १२० टक्के व्याज वसूल केल्याची बाब समोर आली आहे. सावंत याच्या कार्यालयात ६६ कर्जदारांकडून सह्या घेतलेले कोरे स्टॅम्प पेपर, व कोरे चेक सापडले असून, सावंत याच्या बेकायदेशीर सावकारी व्यवसायात अनेक जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सोनल शिंदे यांनी दीड वर्षापूर्वी गरजेपोटी सावंत यांच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते; या बदल्यात त्यांनी ७० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम व्याजापोटी दिली. तरीही सावंत यांच्याकडून पैशांची मागणी सुरूच होती. सावंत आणि त्यांच्या पत्नीने सोनल शिंदे यांना दमदाटी करत शिवीगाळही केली. सावंत यांच्या साथीदारांनी शिंदे यांच्या घरी जात त्यांच्या लहान मुलीलाही धमकावले. यासंदर्भात रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी गंभीर दखल घेत उपनिबंधक सहकारी संस्था यांना कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर उपनिबंधक कार्यालयाकडून तपाससाठी अंजली वझरे यांची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक होनमाने, अंजली वझरे आणि पंचांनी सोमवारी (ता. १७) भाऊ सावंत यांच्या कार्यालयाची झडती घेतली. या वेळी ६६ कर्जदारांकडून कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतलेली कागदपत्रे आणि कोऱ्या चेकवर सह्या घेतलेले चेक आढळून आले.


तक्रारदार सोनल शिंदे यांच्याही कोऱ्या स्टॅम्प पेपरवरील सह्या घेतलेली कागदपत्रे आणि कोऱ्या चेकवर सह्या घेतलेले काही चेक आरोपी भाऊ सावंत याच्या कार्यालयात सापडले. सावंत यांच्याकडे अनेक लोकांनी व्याजाने पैसे घेतल्याचे समोर आले असून, त्यांची मोजणी आणि पंचनामा मंगळवारी (ता. १८) दिवसभर सुरू होती. याप्रकरणी भाऊ सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com