बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध

बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध

Published on

बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध
शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधानंतर निविदा प्रक्रियेबाबतची बैठक रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : बोरीवलीतील भगवती रुग्णालयाची पुनर्बांधणी व केईएमच्या धर्तीवर सर्व सुविधांयुक्त रुग्णालय बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत या कामासाठी ३२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता हे रुग्णालय सार्वजनिक व खासगी धर्तीवर प्रचलन व परिरक्षण करण्याचे जाहीर करून निविदाही काढण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या खासगीकरणाला शिवसेना ठाकरे गटाने तीव्र विरोध केला आहे.
शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी सोमवारी (ता. २४) पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची याबाबत भेट घेतली. दरम्यान, या विरोधानंतर पालिकेची याबाबतच्या निविदा प्रक्रियेबाबतची नियोजित बैठक रद्द झाली असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. पश्चिम उपनगरांतील बोरीवली येथे १९६८-६९ साली पालिकेचे भगवती रुग्णालय सुरू करण्यात आले. या रुग्णालयात गोरेगाव ते मिरा भाईंदर, काही अंशी ठाणे तसेच वापी-गुजरात या १०० किमी परिसरातील गरीब व गरजू, आदिवासी पाड्यातील रुग्ण उपचार घेतात. २००५ नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम उपनगरांतील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन या रुग्णालयाची पुनर्बांधणी व केईएमच्या धर्तीवर सर्व सुविधांयुक्त बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालिकेने या रुग्णालयाची पुनर्बांधणी केली. यासाठी पालिकेने ३२० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. आता चालू आर्थिक वर्षासाठीच्या पालिका अर्थसंकल्पात भगवती रुग्णालय सार्वजनिक व खासगी धर्तीवर (पीपीपी तत्त्वावर) प्रचलन व परिरक्षण करण्याचे जाहीर करून पालिकेने गेल्या १० मार्चला याबाबतच्या निविदा काढल्या आहेत. सुमारे २२ हजार २०० चौ. मीटर क्षेत्रफळ असलेल्या जागी ३.०५ चटई क्षेत्र देऊन नऊ माळ्यांचे ४९० खाटा असलेले हे रुग्णालय होत आहे. पालिकेने काढलेल्या निविदेनुसार गरीब रुग्णांनाही निश्चित दराने रुग्णसेवा दिली जाणार असल्याचे म्हटले आहे, असा आरोप विनोद घोसाळकर यांनी केला आहे.
या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव असून आम्ही तो हाणून पाडू, असे घोसाळकर यांनी म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर आणि शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेऊन रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध केला. या विरोधानंतर निविदा प्रक्रियेबाबतची प्रशासनाची नियोजित बैठकही रद्द करण्यात करण्यात आली असल्याचे घोसाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com