देखभाल-दुरुस्‍तीअभावी बस नादुरुस्‍त

देखभाल-दुरुस्‍तीअभावी बस नादुरुस्‍त

Published on

समीर रिसबूड ः सकाळ वृत्तसेवा
श्रीवर्धन, ता. २५ ः कोकण विभागातील अग्रेसर अशी ख्याती असलेल्या श्रीवर्धन आगारातून कोरोना पूर्व काळात दररोज लांब पल्ल्याच्या, ग्रामीण भागात अनेक फेऱ्या सुरू होत्‍या; मात्र लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्‍या. ज्‍या आजतागायत सुरू झालेल्‍या नाहीत. त्‍यामुळे प्रवाशांची विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याशिवाय बस नादुरुस्‍त होण्याचे प्रकारही वाढल्‍याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
बंद झालेल्‍या एसटी फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत आहे; मात्र आर्थिक उत्पन्न कमी असल्‍याचे कारण देण्यात येत आहे. अलिबाग, ठाणे, रोहा, कर्जत, रत्नागिरी, कोल्हापूर, बोरिवली, मुंबई, चिपळूण, तळा तसेच माणगाव व महाडकडे जाण्या-येण्यासाठी किमान दोन तासांच्या अंतराने गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. रात्री साडेनऊ ते पहाटे चारदरम्यान माणगाव किंवा महाड या मार्गावर एकही बस जात नसल्याने किमान मिनीबस सोडण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
देखभाल-दुरुस्‍तीअभावी अनेक गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. खिडक्‍यांच्या काचा तुटल्‍या आहेत, आसन व्यवस्‍था मोडकळीस आली आहे, याशिवाय धावत्‍या गाडीत स्टार्टरने पेट घेणे, ब्रेक निकामी होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. दोन-तीन वर्षांत चालत्या गाडीची चाके निखळण्याच्या चार ते पाच घटना घडल्या आहेत. मुंबई, बोरिवली मार्गावर जाणाऱ्या शिवशाही गाड्यांची वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

महिला सुरक्षित ही जमेची बाजू
श्रीवर्धन बसस्थानकापासून पोलिस ठाणे ३०० मीटर अंतरावर असून याठिकाणी रात्री पोलिस गस्त घालत असल्याने महिला प्रवाशांसाठी सुरक्षित स्‍थानक मानले जाते. शिवाय मूलभूत सोयी-सुविधाही उपलब्‍ध आहेत. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुस्थितीत असून दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प, व्हिलचेअर व आरामाकरिता स्वतंत्र खोली उपलब्‍ध आहे.

आगारातील दैनंदिन आढावा
एकूण गाड्या - ५५
लांब पल्ला - ६ नियते (६ फेऱ्या)
मध्यम लांब पल्ला - २९ नियते (५८ फेऱ्या)
ग्रामीण - २१ नियते (१९० फेऱ्या)
चालक - ४४
वाहक - २६
दैनंदिन प्रवासी - ११,०००
दैनंदिन उत्पन्न - ६,००,०००

श्रीवर्धन स्थानकातून महाड, माणगाव येथे जाण्यासाठी दोन तासांच्या अंतराने गाड्या सोडण्यात याव्यात. येथे मोठे दवाखाने आहेत व रुग्णांना उपचारासाठी अनेक वेळा जावे लागते. सामान्य रुग्णांना खासगी गाडीचे भाडे परवडत नाही.
- हरिदास वाघे, प्रवासी

मुंबई शहराकडे जाणाऱ्या अनेक गाड्या बंद केल्या आहेत. त्‍यामुळे खासगी बसचा आधार घ्‍यावा लागतो. त्‍याचे भाडे दुप्पट असल्‍याने नाहक भुर्दंड सहन करावा लागतो.
- प्रिया चोगले, प्रवासी- भैरवनाथ पाखाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com