पालघरमधील ११५ ग्रामपंचायती ‘क्षयरोगमुक्त''

पालघरमधील ११५ ग्रामपंचायती ‘क्षयरोगमुक्त''

Published on

पालघरमधील ११५ ग्रामपंचायती ‘क्षयरोगमुक्त’
पालघर, ता. २५ (बातमीदार) : जागतिक क्षयरोगदिनानिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हातील ग्रामपंचायतींना ‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषद पालघर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. जिल्ह्यात एकूण ११५ ग्रामपंचायतींना ‘क्षयरोगमुक्त’ पुरस्कार मिळाला आहे. तर पालघर तालुक्यातील ४० क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींचा पुरस्कार मिळाला. सोमवारी (ता. २४) दुपारी पालघर जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात हा सोहळा आयोजित केला होता.

दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून एका संकल्पनेवर भर दिला जातो. यंदा ‘होय, आपण क्षयरोग निश्चितपणे संपवू शकतो, प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या’ अशी थीम होती. या वेळी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत येणाऱ्या सागावे ग्रामपंचायतीने सलग दुसऱ्यांदा ‘क्षयरोगमुक्त’ पुरस्कार पटकावला. त्यामुळे त्यांना रौप्यपदक प्रदान करून सन्मानित केले. इतर ३९ ग्रामपंचायतींना कांस्यपदक प्रदान करण्यात आले. या वेळी संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आशासेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सीएसआर निधीतून क्षयरोग रुग्णांना अन्नधान्य कीट पुरवणाऱ्या लुपिन, जेएसडब्ल्यू आणि निऑन या तीन कंपन्यांचाही सत्कार केला. तसेच, क्षयरोगावर आधारित रांगोळी स्पर्धेत विजेते ठरलेल्या पहिल्या तीन क्रमांकांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे यांनी केले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी, ग्रामपंचायती, आरोग्य विभाग आणि आशा कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा यशस्वी उपक्रम राबवला गेला. क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी आपण सर्वांनी अधिक जोमाने कार्य करावे, असे प्रतिपादन केले.

पथनाट्य सादर
पालघर जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, अशी विनंती आरोग्य विभागाकडून करण्यात आली. या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून उपचार घ्यावेत, तसेच इतरांनाही याबाबत जागरूक करावे, असे आवाहन डॉ. संतोष चौधरी यांनी केले. या वेळी सूर्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी क्षयरोगावर आधारित पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तन्वीर शेख यांनी आभार प्रदर्शन केले. या वेळी आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, संपूर्ण क्षयरोग टीम उपस्थित होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com