श्रीवर्धन नगरपरिषदेची ३५ टक्‍के तिजोरी रीती

श्रीवर्धन नगरपरिषदेची ३५ टक्‍के तिजोरी रीती

Published on

श्रीवर्धन, ता. २५ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात ‘क’ वर्गात मोडणाऱ्या श्रीवर्धन नगर परिषदेच्या करवसुलीची टक्‍केवारी यंदा घसरली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्‍लक आहेत, त्‍यामुळे नगर परिषदेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची करवसुलीसाठी धावाधाव सुरू आहे. रहिवासी वस्‍ती, चौकाचौकांत उद्‌घोषणा करून कर भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे; मात्र तरीही जवळपास ३५ टक्‍के वसुली थकीत असल्‍याचे दिसून येत आहे.
श्रीवर्धन नगर परिषद क्षेत्रात ५,१२५ मालमत्ताधारक आहेत तर नळजोडणी असलेल्‍या ग्राहकांची संख्या २,४०९ इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ताधारकांकडून ६७.१९ टक्के आणि ६५.१२ टक्के पाणीपट्टीची इतकीच वसुली झाली आहे. पर्यटन क्षेत्रात ‘ब’ दर्जा प्राप्त झालेल्या श्रीवर्धन नगर परिषद प्रशासनाकडून कर वसुलीतून मिळणाऱ्या रकमेतून शहरातील विकासकामे, पाणी, पथदिवे, स्वच्छता केली जाते.
मार्चअखेर असल्‍याने नगर परिषदेने करवसुलीसाठी कंबर कसली आहे. नगर परिषदेतर्फे ध्वनिक्षेपक, बॅनर्सद्वारे करभरणा करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच कर न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, नळजोडणीही खंडित करण्यात येईल, तसेच नगर परिषद कार्यालयातून कोणतीही अधिकृत कागदपत्रे मिळणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला आहे.
मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकी वसुलीकरिता नगर परिषदेने सात पथके नेमली आहेत. घरोघरी जाऊन पथके वसुलीबाबत सूचना दिल्‍या जात असल्‍या तरी अद्याप जवळपास ३५ ते ४० टक्‍के तिजोरी रिकामी आहे. श्रीवर्धनमध्ये ५,१२५ मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडून एक कोटी ३२ लाख ७३ हजार रुपये करवसुली होणे अपेक्षित होते. २० मार्चपर्यंत ८९ लाख १९ हजार रुपये इतकी वसुली झाली आहे. तर नळजोडणी ग्राहकांची संख्या २,४०९ असून ४२ लाख ५७ हजार रुपये इतकी वसुली अपेक्षित आहे; मात्र प्रत्यक्षात २७ लाख ७२ हजार इतकीच वसुली झाली आहे.

नगर परिषदेकडून स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे वीजबिले, रस्ते, उपलब्ध सोयी-सुविधांची देखभाल दुरुस्ती ही स्व-उत्पन्नातून करण्यात येते. नागरिकांनी कर न भरल्याने नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी नगर परिषदेचे सर्व कर भरून सहकार्य करावे.
- विराज लबडे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगर परिषद

........................

म्‍हसळ्यात चार घरांसह गाळ्यावर कारवाई
म्हसळा, ता. २५ (बातमीदार) ः नगर पंचायतीच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. श्रीवर्धन- गोरेगाव तीन घरे आणि एक गाळा सील करण्यात आल्या आहे. थकबाकीधारकांनी कराची रक्कम न भरल्यास ही कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तरी नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी त्वरित भरणा करावी, असे आवाहन मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com