कारमधून पाठलाग करत विवाहितेचा विनयभंग
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका ४८ वर्षीय विवाहितेचा ४३ वर्षीय व्यक्तीने कारमधून पाठलाग केला. त्यानंतर त्याने महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सीबीडीमध्ये रविवारी (ता. २३) सकाळी घडला. सीबीडी पोलिसांनी या घटनेतील आरोपी प्रथमेश सोनटक्के याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला नोटीस बजावून सोडून दिले आहे.
या घटनेतील ४८ वर्षीय तक्रारदार विवाहिता सीबीडी परिसरात राहण्यास असून त्या दररोज सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी जातात. रविवारी सकाळीदेखील त्या बाहेर पडल्या होत्या. या वेळी पीडित विवाहिता रायगड भवनसमोरील रस्त्यावरून पायी चालत जात असताना, त्यांच्या पाठीमागून कारमधून आलेल्या आरोपी प्रथमेश सोनटक्के याने त्या एकट्याच असल्याने त्यांना कारमधून घरी सोडण्याबाबत विचारणा करून त्यांना कारमध्ये बसण्यास आग्रह केला; मात्र पीडित विवाहितेने त्याला नकार दिला असता, सोनटक्के याने विवाहितेचा पाठलाग सुरूच ठेवला. त्यामुळे घाबरलेल्या विवाहितेने रायगड भवनसमोरील मैदानावर धाव घेतली असता, सोनटक्के याने मैदानाबाहेर उभे राहून विवाहितेची वाट पाहण्यास तसेच हॉर्न वाजवून विवाहितेला बाहेर येण्याचा इशारा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडित विवाहितेने ११२ वर संपर्क साधल्यानंतर काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी प्रथमेश सोनटक्के याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

