मिरा रोडसाठी स्वतंत्र शिधावाटप कार्यालय

मिरा रोडसाठी स्वतंत्र शिधावाटप कार्यालय

Published on

मिरा रोडसाठी स्वतंत्र शिधावाटप कार्यालय

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भाईंदर येथील एकमेव शिधावाटप कार्यलयावर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. यासाठी मिरा रोड येथे स्वतंत्र शिधावाटप कार्यालय स्थापन करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू झाल्या आहेत. नवीन कार्यालय सुरू करण्यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारकडून शिधावाटप नियंत्रकांना देण्यात आले आहेत.

शहराची लोकसंख्या सध्या १५ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. या सर्वांसाठी भाईंदर पूर्व भागात उड्डाणपुलाखाली एकमेव शिधावाटप कार्यालय आहे. या कार्यालयात कर्मचारीवर्ग अपुरा आहे. या कार्यालयाकडून नवीन शिधावाटप पत्रिका, पत्रिकेतील पत्ता बदलणे, कुटुंबातील सदस्याचे नाव कमी करणे अथवा नवे नाव समाविष्ट करणे आदी कामे केली जातात. परंतु वाढत्या कामाच्या बोजामुळे नागरिकांची कामे व्हायला बराच वेळ लागतो. नागरिकांना कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. ही गैरसोय टाळण्यासाठी मिरा रोड येथे नवे शिधावाटप कार्यालय स्थापन करावे, जेणेकरून कामाची विभागणी होऊन नागरिकांची कामे लवकर होतील, अशी मागणी मिरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

शिधावाटप कार्यालयात नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या असंख्य तक्रारी येत असल्याने काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मेहता यांनी शिधावाटप कार्यालयातच दोनदिवसीय शिबिराचे आयोजन केले होते. त्या वेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या शिबिरात येऊन आपले अर्ज दाखल केले होते. यावरून शहरात स्वतंत्र शिधावाटप कार्यालयाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. मेहता यांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या विभागाने शिधावाटप नियंत्रकांच्या नावे नुकतेच आदेश जारी केले आहेत.

मिरा-भाईंदर शहरात दरवर्षी २० ते २५ हजार लोक नव्याने राहायला येत आहेत. मिरा रोड परिसरात सर्वाधिक लोकसंख्येत वाढ होत आहे. यासाठी मिरा रोड येथे नवीन शिधावाटप कार्यालय स्थापन करण्याची आवश्यकता आहे. शिधावाटप नियंत्रकांकडून प्रस्ताव सादर झाल्यानंतर नवीन शिधावाटप कार्यालयाची निर्मिती होणार आहे.
- नरेंद्र मेहता, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com