

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : वडील रागवत असल्यामुळे व खेळू न दिल्यामुळे रागाने घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी अखेर १४ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर शोधून काढले असून, त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. एनआरआय सागरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग १४ दिवस अथक प्रयत्न करून जवळपास २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. बेपत्ता असलेला ११ वर्षीय मुलगा नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात सापाडल्यानंतर पोलिसांनी मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.
या घटनेतील ११ वर्षीय मुलगा आई-वडील व मोठ्या बहिणीसह नेरूळमधील करावे गावात राहण्यास आहे. तो सहावीत शिक्षण घेत आहे. १० मार्चला तो सायकल घेऊन आपल्या घरातून निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली; मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर त्यांनी एनआरआय पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुकाराम पवळे यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली.
------------------
१४ दिवसांची शोधमोहीम
गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन ढगे, पोलिस उपनिरीक्षक आकाश ठाकरे, विष्णू वाघ, पोलिस हवालदार विजय देवरे, जितेंद्र पाटील, पोलिस नाईक दामोदर वाघमारे, माणिक डोंबाळे, प्रशांत वाघ, मनोहर इंगळे, सोनवणे आदींच्या पथकाने नेरूळ, सीवूड्स, टी. एस. चाणक्य, नेरूळ गाव, नेरूळ रेल्वे स्थानक तसेच ३० उद्यान परिसरातील सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने तपासणी केली. अहोरात्र मेहनत घेत तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने बेपत्ता मुलाचा शोध घेतला असता, तो सोमवारी (ता. २४) नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. वडील ओरडत असल्यामुळे तसेच त्याला खेळू देत नसल्यामुळे मुलगा घर सोडून गेल्याचे तपासात स्पष्ट झाले.
-----------------
पदपथावर काढले दिवस
घरातून बाहेर पडल्यानंतर तो मुलगा नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे फुटपाथवर राहिला. त्यानंतर तो तेथील झोपडीत राहणाऱ्या लोकांमध्ये गेला. त्यांच्याकडून मिळेल ते खाऊन त्यांच्या मुलांसोबत खेळत-बागडत राहिला. तो मुलगा आजुबाजुलाच राहत असेल असे वाटल्याने त्याच्याबाबत कोणी पोलिसांकडे तक्रार केली नाही. १४ दिवस त्यांच्यामध्ये तो राहिला. अखेर पोलिसांनी तांत्रिक आणि प्रत्यक्ष तपासाची उत्कृष्ट सांगड घालत त्याला शोधून काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.