

ठाण्यातील कचराकोंडी सुटण्याची चिन्हे
कचऱ्याचे स्पॉट झाले कमी; ठाणेकरांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : शहरात मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात येत होती. अशातच आता कचरा प्रश्नावर पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यात घनकचरा विभागाला काही अंशी यश आले आहे. त्यामुळे शहरात नव्याने निर्माण झालेले कचऱ्याचे स्पॉटदेखील आता पुन्हा कमी झाल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. मागील काही दिवसांत १५ हजार मेट्रिक टन कचरा उचलल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
ठाणे शहरात कचऱ्याचा प्रश्न मागील १० ते १५ दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. डायघर प्रकल्प बंद झाल्याने शहरात जागोजागी साचणाऱ्या कचऱ्याचे ढीग साचले होते. सीपी तलाव हस्तांतरण स्थानकाच्या ठिकाणी वाढलेल्या ताणामुळे शहरात कचरा कोंडी झाली होती. यामुळे घनकचरा विभाग चांगलाच अडचणीत आला होता. त्यामुळे या कचरा समस्येवर उपाय म्हणून पालिकेने अखेर आपला मोर्चा भिवंडीतील आतकोली येथे वळविला आहे. सध्या रोजच्या रोज कचरा साठवला जात आहे. या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, असा दावा महापालिकेने केला आहे. दुसरीकडे शहराच्या विविध भागांत असलेले कचऱ्याचे स्पॉट आता काही अंशी का होईना कमी होण्यास सुरुवात झाली आहे. किंबहुना यापूर्वी बंद असलेल्या स्पॉटवरदेखील कचऱ्याचे ढीग दिसत होते. तेदेखील आता कमी झाले असल्याचे दिसून आले आहे.
रोजच्या रोज शहराच्या विविध भागांत घंटागाड्यांसह डंपरदेखील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या दिमतीला जेसीबी लावण्यात आला आहेत. त्यामुळे हा कचरा थेट डम्परमध्ये जमा केला जात आहे. तेथून तो सीपी तलाव, गायमुख किंवा अन्य ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात टाकून पुढे आतकोलीला नेला जात आहे, असे घनकचरा विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, सीपी तलाव येथे साचलेला कचरा कमी करण्याचेदेखील महापालिकेचे प्रयत्न असून, त्यानुसार आता येथील एक लाख मेट्रिक टन कचऱ्यापैकी १५ हजार मेट्रिक टन उचलला गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.