समृद्ध संस्कृती जीवनाच्या पंचसूत्रीवर चित्ररथ
समृद्ध संस्कृती जीवनाच्या पंचसूत्रीवर चित्ररथ
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : २७ वर्षांची परंपरा असलेल्या डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत यंदा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंब या समृद्ध व संस्कृती जीवनाच्या पंचसूत्रीवरील चित्ररथ असणार आहेत. याशिवाय आठवडाभर धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. वृंदावनचे प्रभूदेशदास धर्मप्रसारक महंद आचार्य प्रणय महाराज या वेळच्या नववर्ष स्वागत यात्रेचे विशेष अतिथी असणार आहेत.
देशातील सध्याचे वास्तवदर्शी चित्रण स्वागत यात्रेच्या माध्यमातून प्रकट करावे म्हणून यावेळी समृद्ध व संस्कृती जीवन पद्धतीवर चित्ररथांची आखणी करण्यात आली आहे. विविध प्रकारचे ४० हून अधिक चित्ररथ स्वागत यात्रेत सहभागी असतील. ८० विविध प्रकारच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रातील संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहेत. स्वागत यात्रेच्या सलगतेमध्ये कोठेही खंंड पडू नये म्हणून चौदा ढोल पथकांना चौकांमध्ये ढोल वादनाला परवानगी देण्यात आली आहे. संस्कार भारतीतर्फे गणेश मंदिरासमोर महारांगोळी काढण्यात येणार आहे. सोमवारी (ता. २४) दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला राष्ट्रभक्तिपर गीतांचा देव-देशोपासनेचा कार्यक्रम मंदिरात पार पडला. श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे ही नववर्ष स्वागत यात्रा आयोजित केली जाते. स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला गणेश मंदिराच्या अध्यक्षा प्रवचनकार अलका मुतालिक, विश्वस्त प्रवीण दुधे, गौरी खुंटे, श्रीपाद कुळकर्णी, प्रमुख संयोजक अमेय काटदरे, मंदार हळबे, जयकृष्ण सप्तर्षी, आनंद धोत्रे, राजय कानिटकर, दीपक काळे उपस्थित होते.
स्वागत यात्रेचे औचित्य साधून जून महिन्यापासून इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश मंदिरात दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळच्या वेळेत सामुदायिक वाढदिवस अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. डोंबिवलीतील १६ शाळांमधील आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना गणेश मंदिर संस्थानतर्फे २५ ते २७ मार्च या कालावधीत डोंबिवलीतील पूजा सिनेमागृहात संभाजी महाराजांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट मोफत दाखविला जाणार आहे. २८ मार्चला गणेश मंदिर येथे संध्याकाळी सात वाजता भक्तिगीत व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. २९ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता महिला, पुरूष, तरुणांसाठी खुली असलेली स्कुटर फेरी शहरातील १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर काढण्यात येणार आहे. याच दिवशी संध्याकाळी संभाजी महाराज बलिदानदिनानिमित्त भागशाळा मैदान येथे साहसी खेळ, मानवी मनोरे, ढोल, लेझीम पथकांची प्रात्यक्षिके संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहेत.
रामनाम जपयज्ञ
रविवारी सकाळी पाच वाजता पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते गणेश मंदिरात महापूजा होईल. सात वाजता भागशाळा मैदान येथून प्रचलित मार्गावरून स्वागत यात्रेला प्रारंभ होणार आहे. ३० मार्च ते ६ एप्रिलदरम्यान रामनाम जपयज्ञ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

