ठाणेकरांचा सीएनजी बॉम्बसह प्रवास
सीएनजी बॉम्बसह रिक्षाप्रवास
ठाण्यात चुकीच्या पद्धतीने टाक्या बसविण्याचे प्रकार; अपघाताचा धोका
राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. २५ : प्रादेशिक परिवहन विभागातील रिक्षाचालक आणि प्रवासी अक्षरशः बॉम्बवर बसून प्रवास करीत आहेत. रिक्षांच्या सीएनजी बाटला तपासणीवर प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे महापालिका आणि सुरक्षा विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने बेकायदा रेट्रो फिटर आणि कीट फिटिंग करणाऱ्यांमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सीएनजी इंधनाचा संबंध थेट भारतीय सैन्य दलाच्या दारू गोळा विभागाशी येतो; मात्र अतिधोकादायक बाबींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. महिनाभरापूर्वी कॅडबरी येथे रिक्षाचालक लघुशंकेला उतरला असता अचानक रिक्षाने पेट घेतल्याची घटना घडली होती. या वेळी रिक्षात प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला होता.
प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने पेट्रोल, डिझेलऐवजी सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा रस्त्यांवर उतरवल्या आहेत. एकट्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या परिक्षेत्रात सुमारे ८० हजारांहून अधिक रिक्षा धावतात. यातील सुमारे ९९ टक्के रिक्षा सीएनजीचा वापर करतात; मात्र हाच सीएनजी आता प्रवाशांच्या जीविताला धोका पोहोचविण्याची भीती निर्माण झाली आहे. ही यंत्रणा हाताळताना प्रचंड प्रमाणात निष्काळजीपणा दाखवला जात आहे. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांची सुरक्षा रामभरोसे आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही रिक्षा पासिंग करताना सीएनजी कीट यंत्रणेचीसुद्धा पाहणी होते. गॅस साठवणाऱ्या बाटल्याची गुणवत्ता तपासली जाते; मात्र ही तपासणी कागदोपत्री होते. रिक्षाचालकाकडे अधिकृत गॅस एजन्सीचे फिटनेस प्रमाणपत्र आहे की नाही हे पहिले जाते; मात्र गॅस बाटल्याची फिटनेस टेस्टिंग परवानाधारक एजन्सीने केली की नाही, अथवा ती करताना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे की नाही, याची कोणतीच खतरजमा प्रादेशिक परिवहन विभागाकडून होताना दिसत नाही. ‘सकाळ’च्या पाहणीत ठाण्यातील खोपट येथील गॅस बाटला सर्व्हिसिंग सेंटरमध्ये बाटल्याची तपासणी योग्य प्रकारे केली जात नसल्याचे दिसून आले.
काय आहे प्रक्रिया?
नियमानुसार बाटला रिक्षामधून काढून तो जमिनीत खड्डा करून त्यामध्ये ठेवायचा असतो. त्यानंतर तिथेच त्यात हवेचे फूल प्रेशर देऊन त्याची तपासणी करायची असते; परंतु ठाण्यात असे काही होत नाही. अनेकजण गॅस बाटला रिक्षातच प्रेशर देऊन तपासतात. तो रिकामा करून पुन्हा त्यात हवा भरतात. प्रेशर गेज, पाइपलाइनची तपासणी वरवर केली जाते आणि फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. ते सर्टिफिकेट मान्य करून प्रादेशिक परिवहन विभागाकडून बाटला पासिंगचा दाखला दिला जातो.
बेकायदा तपासणी
ठाणे, मुंबईत २००५ पासून सीएनजी सेवा व वाहनांना सीएनजी कीट बसवताना सर्व कायदेशीर बाबी, अटी, शर्थींची पूर्तता केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अशा वाहनाचे तपासणी करून वाहनाला सीएनजी भरणा व वापर परवाना दिला जायचा; परंतु २०१८-१९ नंतर सरकारने कोणतेही अधिसूचना काढली नाही; मात्र काही गॅरेजवाले अधिकाऱ्यांना हाताशी धरून सीएनजी तपासणीची कामे करीत आहेत. सीएनजी टेस्टिंग सहाशे सातशे रुपये घेतले जायचे; परंतु आता २,५०० ते ३,००० घेतले जात आहेत. सीएनजी बाटला कीट तपासणी करताना कोणत्याही प्रकारचे अधिकृत बिल दिले जात नाही. बाटल्यामधून पूर्ण गॅस काढून वरवर स्वच्छ करून दिला जातो. प्रादेशिक परिवहन विभाग व कागदपत्र पाहून बाटला पासिंगला मंजुरी देतात, असे एका रिक्षाचालकाने सांगितले.
रिक्षामध्ये बसवल्या जाणाऱ्या सीएनजी बाटला फिटिंग आणि टेस्टिंगचे अधिकार पेसो संस्थेला आहेत. या संस्थेच्या मान्यतेनुसार ज्यांना तपासणीचे अधिकार दिले आहेत. त्यांचे टेस्टिंग आणि फिटिंगचे ओके असलेले प्रमाणपत्र आम्ही पाहतो. ते पाहूनच संबंधित रिक्षाला आमच्याकडून पासिंगचे प्रमाणपत्र दिले जाते.
- रोहित काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

