धारावीतील रस्ते धोकादायक
धारावीतील रस्ते धोकादायक
अनेक ठिकाणी अवैध पार्किंग; ठोस कारवाईकडे दुर्लक्ष
धारावी, ता. २५ (बातमीदार) : धारावी येथील निसर्ग उद्यानाजवळ एका ट्रकमधील गॅस सिलिंडरमुळे आग लागल्याची घटना सोमवारी (ता. २४) घडली. या दुर्घटनेनंतर धारावी परिसरातील अवैध पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुर्ला वाहतूक विभागाकडे अनधिकृत पार्किंगबाबतची तक्रार ७ मार्चला करूनही वाहतूक विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
धारावीतील ९० फुटी रस्ता, ६० फुटी रस्ता, संत रोहिदास मार्ग, टी जंक्शन, धारावी मुख्य रस्ता अशा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने पार्क करून ठेवली जातात. याकडे स्थानिक सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी अनेकदा वाहतूक विभागास लेखी व तोंडी तक्रारी दिलेल्या आहेत. त्यावर वाहतूक विभाग थातूरमातूर कारवाई करून वेळ मारून नेत आहे, असा धारावीकरांचा आरोप आहे.
निसर्ग उद्यानासमोरील अनधिकृत पार्किंगची लेखी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक १८६चे शाखा अध्यक्ष संदीप कवडे यांनी ७ मार्च रोजी वाहतूक विभागाच्या कुर्ला कार्यालयाकडे केली होती; मात्र वाहतूक विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप होत आहे. या रस्त्यावर पालिकेची वाहने व सिलिंडर वाहतूक करणारी वाहने नित्यनियमाने उभी असतात. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हीच दुर्घटना तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या राजीव गांधी नगरसमोरील रस्त्यावर घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती.
यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, वाहतूक विभाग कुर्ला यांनी बोलण्यास नकार दिला.
कारवाई सुरूच राहणार
धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर म्हणाले, की अनधिकृत वाहनतळावर कारवाई केली आहे. पुढेही कारवाई सुरूच राहील. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक कार्यालय पुन्हा धारावीत आणा!
धारावीतील पीएमजीपी वसाहतीत धारावी वाहतूक विभागासाठी कार्यालय होते. ते कार्यालय सध्या कुर्ला येथे हलवले आहे. हे कार्यालय धारावीत असताना या अनधिकृत वाहनतळांना लगाम घालण्यात वाहतूक विभागाला यश आले होते. त्यामुळे वाहतूक विभागाचे कार्यालय पुन्हा धारावीत आणणे आवश्यक असल्याचे मत मनसेचे पदाधिकारी आणि नागरिकांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

