

कोंडीवरून समाजमाध्यमांमध्ये संताप
मनसे नेते राजू पाटील यांची पोस्ट व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : कल्याण-शिळ रोडवरील वाहतूक कोंडीत तासन्तास नागरिक खोळंबत आहे. वर्षानुवर्षे या मार्गावर हीच परिस्थिती असून, नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासन पाहत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या समस्येवरून मनसेचे नेते राजू पाटील यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केली आहे. यातून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात आले आहे. तसेच परिस्थिती सुधारली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारादेखील दिला आहे.
कल्याण-शिळ रोडचे अनेक भागात रुंदीकरण काम रखडले आहे. सहा मार्गिकेचा हा मार्ग होणार आहे; मात्र या रखडलेल्या कामामुळे केवळ चार मार्गिकेचा मार्ग तयार झाला आहे. यातच लोकसभा निवडणुकीनंतर या मार्गावर मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे रस्त्याच्या मध्यभागातील दोन लेन पत्रे लावून बंद केल्या आहेत. यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊन अवघा एक किमी अंतराचा टप्पा गाठण्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागत आहे. बुधवारी सकाळी झालेल्या वाहतूक कोंडीत शाळेच्या बस अडकल्याने शाळा प्रशासनाला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सहा महिन्यांच्या कालावधीत तिसऱ्यांदा घ्यावा लागला आहे. या वाहतूक कोंडीत शाळेच्या बस, रुग्णवाहिका, चाकरमानी यांचे दररोज हाल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कल्याण ग्रामीणचे माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच परिस्थिती सुधारली नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. कल्याण-तळोजा मेट्रो येथील नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या फायद्याची नाही. मेट्रो फक्त आणि फक्त विकसकांच्या फायद्यासाठी आहे. याप्रकल्पातून मिळणाऱ्या टक्केवारीसाठी येथे आणली आहे. एकीकडे कल्याण-शिळ रस्त्याच्या तिसऱ्या मार्गीकेचे भूसंपादन झाले नाही. दुसरीकडे ठेकेदारांना द्यायला पैसे नाहीत म्हणून पलावा पूल रखडला आहे. तरीही या प्रकल्पाचेही पूर्ण भूसंपादन झाले नसताना लोकसभेच्या तोंडावर लोकांना खोटा विकास दाखविण्यासाठी काम सुरू करण्यात आले. या ‘विकसकांच्या मेट्रोसाठी विद्यार्थी, पेशंट, नोकरदारवर्ग व सर्वसामान्य नागरिकांना वेठीस नेण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.