

शोभायात्रेत यंदा प्रथमच ‘बरची पथक’
कल्याण, ता. २७ (बातमीदार) : शहरात यंदाही शोभायात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा प्रथमच शोभायात्रेत बरची हे शिवकालीन हत्यार घेतलेले विद्यार्थ्यांचे पथक सहभागी होणार आहे. या पथकाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. त्यांच्यासह ढोल पथक, महिलांच्या लेझीम पथकाचादेखील सराव सुरू आहे. कल्याण संस्कृती मंच आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमध्ये नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. ढोल- ताशांचा गजर आणि कल्याणच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा दाखवणारे देखावे, असे या शोभायात्रेचे स्वरूप असते. गेल्या काही वर्षांपासून कल्याणची ही शोभायात्रा शहराच्या सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवत आहे.
यंदाही शोभायात्रेत विविध देखावे, वाद्य पथके सहभागी होणार आहेत. यंदा बरची हे शिवकालीन हत्यार घेतलेले विद्यार्थ्यांचे पथक सहभागी होणार असून, सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. त्यामुळे एरव्ही दांडपट्टा, भाले अशा शिवलकालीन हत्यारांसह आता बरची या शिवकालीन हत्याराचाही शोभायात्रांमध्ये समावेश होतो. यासाठी शिवमुद्रा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. गेली ११ वर्षे ते कल्याण येथील शोभायात्रेत सहभागी होत आहेत.
शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अंकुर आहेर म्हणाले की, “बरची हे शिवकालीन हत्यार आहे. शिवकाळात त्याचा संरक्षणासाठी वापर होत असे. त्याचा प्रथमच अंतर्भाव शोभायात्रेतील पथकात करणार आहोत. बालक मंदिर सेकेंडरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील ४० मुले-मुली या पथकात बरची घेऊन कवायती करतील. बालक मंदिर संस्थेचे अध्यक्ष मयुरेश गद्रे, सचिव डॉ. सुश्रुत वैद्य, समन्वयक अशोक जाधव यांच्या प्रोत्साहनातून या बरची पथकाचा सराव बालक मंदिर शाळेत सुरू झाल्याचेही आहेर यांनी म्हटले.
लेझीम पथकांचेही आकर्षण
शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकाचे व्यवस्थापक सौरभ मंचेकर व आकाश वाडकर यांच्या प्रयत्नांतून फुल मार्केट इथे ढोल-ताशा पथकाचा सराव सुरू आहे. या पथकात ३५ ते ४० ढोल असून, १५ ताशे असणार आहेत, तर सरिता मिसाळ, निकिता आंबेकर, सुरेखा जाधव यांनी महिलांच्या लेझीम पथकासाठी विशेष मेहनत घेतली आहे. यंदा लेझीम पथकात ४० ते ५० वयोगटातील ५५ महिला सहभागी होणार आहेत.
शोभायात्रेचा मार्ग
सिंडीकेट, मुरबाड रोड-कमिश्नर बंगला-संतोषी माता रोड मार्गे-सहजानंद चौक-शिवाजी चौक-टिळक चौक-पारनाका-लालचौकी-नमस्कार मंडळ क्रीडांगण
यात्रेची वेळ - सकाळी ६ ते १०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.