

शोभायात्रेनिमित्त डोंबिवलीतील फडके रोड बंद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली तसेच आजूबाजूच्या शहरातील नागरिक या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होतात. या यात्रेत विविध संस्थाचे चित्ररथ सहभागी होतात. या शोभायात्रेनिमित्त रविवारी (ता. ३०) फडके रोडवरील वाहतूक पहाटे ४ ते दुपारी १ या काळात बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. यादरम्यान पर्यायी मार्गांचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी केले आहे.
ठाणे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून फडके रस्ता वाहतूक बंदची अधिसूचना काढली आहे. अत्यावश्यक सेवेतील अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, पोलिस वाहनांना या रस्त्यावरून प्रवेश असणार आहे. फडके रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. स्वागत यात्रेच्या मार्गात वाहनांचा अडथळा आणि कोंडी नको म्हणून वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान, सुभाषचंद्र बोस रस्ता, महात्मा फुले रस्ता, दीनदयाळ रस्ता, कोपर पूल, शिवमंदिर रस्ता, डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्ता, मानपाडा रस्ता आणि फडके रस्ता असा स्वागत यात्रेचा मार्ग आहे.
प्रवेश बंद
फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, मदन ठाकरे चौक, आप्पा दातार चौक रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना रविवारी बंद असेल.
छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारड सर्कल) मार्गे डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्याने ब्राह्मण सभेवरून फडके रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
डोंबिवली पश्चिमेकडून कोपर पुलावरून पूर्व भागात जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रम, नवी मुंबई पालिका उपक्रमाच्या बसना टिळक रस्ता येथे प्रवेश बंद केला जाणार आहे.
पर्यायी मार्ग
फडके रस्त्याकडे डोंबिवली पश्चिमकडून येणारी वाहने स. वा. जोशी शाळा नेहरू रस्ता, व्ही. पी. रस्त्याने इच्छितस्थळी जातील. कोपर पुलाकडे येणारी वाहने महात्मा फुले रस्ता, रेल्वे मैदान, गणेशनगर भागातून इच्छितस्थळी जातील. कल्याण-डोंबिवली पालिका, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने चार रस्त्यावरून पाटणकर चौक, मानपाडा रस्त्याने इच्छितस्थळी जातील.
नेहरू मैदानात वाहनतळ
नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी डोंबिवली शहर परिसरातून अनेक नागरिक आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांनी येण्याची शक्यता आहे. या उत्सवप्रेमींच्या वाहनांसाठी नेहरू मैदान येथे वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रविवारी पहाटे ४ ते दुपारी १ वाजेपर्यंत या वाहतूक बंद नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी सांगितले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.