होल्डिंग पॉँडमधील मातीचा ढीग

होल्डिंग पॉँडमधील मातीचा ढीग
Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सिडकोने महापालिकेला दिलेल्या जुईनगरच्या होल्डिंग पाँडमधील अतिक्रमणामुळे गेल्या वर्षी जुईनगर व सानपाडा विभागाला फटका बसला. या दोन्ही नोडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेचे कान पिळल्यानंतर पालिकेने तलावाशेजारील अतिक्रमण काढण्यात आले, मात्र तलावात टाकलेली माती न काढल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
जुईनगर सेक्टर २१ येथे प्लॉट नंबर वन-प्लस २ ए हा सुमारे १०.५ हेक्टर असे क्षेत्रफळ असणारा होल्डिंग पॉँड सिडकोने महापालिकेला २०२३ ला देखभालीकरिता हस्तांतर केला आहे. सिडकोने हा तलाव हस्तांतर केल्यानंतर पालिकेने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. परिणामी त्या ठिकाणी राजकीय वरदहस्त असलेले अतिक्रमण थाटण्यात आले. या होल्डिंग पॉँडवर आठ बेकायदा गोदामे उभारण्यात आली होती. बेकायदा बांधकामे उभारण्याकरिता मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यात आला. भूमाफियांनी मातीचा भराव करताना कोणताही विचार न केल्याने या जागेवर क्रिकेटचे भव्य मैदान तयार झाले, शिवाय काही माफियांनी राजकीय लोकांना हाताशी धरून बेकायदा मोबाईल टॉवरदेखील उभारले आहेत. याचिकाकर्ते मल्हार देशमुख यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर महापालिकेने हे सर्व अतिक्रमण काढून टाकले, मात्र तोपर्यंत जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जुईनगर आणि सानपाडा या दोन्ही नोडमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. रस्ते, पदपथ, उद्याने जलमय झाले होते. रहिवाशांच्या घरांपर्यंत पाणी घुसले होते. दोन दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती. होल्डिंग पॉँडमधील मातीमुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नव्हता. त्यामुळे सर्व पाणी तलावातून मागे येऊन रहिवासी परिसरात घुसले होते. अशी परिस्थिती पुन्हा यावर्षी उद्भवू नये याकरिता माती काढावी लागणार आहे, मात्र अद्याप महापालिकेने अतिक्रमण काढण्यासोबत तलावात असलेली माती काढलेली नाही. जर ही माती यावर्षी काढली नाही, तर यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा जुईनगर व सानपाडा विभागात पूरस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.


----------------------------------
होल्डिंग पाँड असे काम करते
नवी मुंबई महापालिकेला जेव्हा सिडकोने होल्डिंग पॉँड वर्ग केला, तेव्हा महापालिकेने विकास आराखड्यात या जागेवर उद्यानाचे आरक्षण टाकले. त्याआधी या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. मोबाईल टॉवर आणि गोदामे होती. याच अतिक्रमणांना अभय देण्यासाठी आरक्षण टाकले होते का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

----------------------------------
मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला बेकायदा असलेल्या सर्व बाबी तलावातून हटवण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने अतिक्रमणासोबत मातीसुद्धा काढायला हवी होती, मात्र महापालिकेने माती न काढल्यामुळे पुन्हा पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. तसेच माती काढून पुन्हा त्या जागेवर तलावाची निर्मिती होणे अपेक्षित होते, परंतु न्यायालयाच्या आदेशाचा उद्देश पूर्ण होत नाही.
मल्हार देशमुख, याचिकाकर्ते
---------------------------------
जुईनगर येथील होल्डिंग पॉँडवरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. तसेच होल्डिंग पॉँडमधील माती शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यासाठी मुंबई आयआयटी यांच्या अभ्यासकांकडून अहवाल मागवला आहे. त्यानुसार नेमकी किती खोली ठेवून माती काढता येईल, हे पाहून निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पावसाळ्याआधीच माती काढण्याचे काम वेगाने सुरू होणार आहे.
डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com