तटस्थपणे सभागृह चालवणारसर्व आमदारांना न्याय देण्य़ाचा प्रयत्न करणार

तटस्थपणे सभागृह चालवणारसर्व आमदारांना न्याय देण्य़ाचा प्रयत्न करणार
Published on

तटस्थपणे सभागृह चालवणार
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ग्वाही

विनोद राऊत

एक पानपट्टी  चालक ते आमदार, विधानसभा उपाध्यक्ष या पदापर्यंतचा यशस्वी प्रवास अण्णा बनसोडे यांनी केला आहे. दलित समाजातून आलेले बनसोडे यांनी पिंपरी विधानसभेचे तीनदा प्रतिनिधित्व केले आहे. नुकतीच त्यांची विधानसभा उपाध्यक्षपदावर एकमताने निवड झाली. त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

तुमचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता?
अत्यंत गरीब कुटुंबात मी जन्मलो. मी दहावी झालो. नंतर आयटीआय करून टेल्कोमध्ये नोकरीला लागलो. १९८०मध्ये अचानक वडिलांचा मृत्यू झाला. घर चालवण्यासाठी तसेच लहान भावाला  शिकवण्यासाठी मी पिंपरीत पानपट्टीचा व्यवसाय सुरू केला. १९८८ मध्ये माझा दिवसभराचा व्यवसाय १७ ते १८ हजार रुपये एवढा होता. पानपट्टीवर सात ते आठ जण कामाला होते. 

पानपट्टी व्यवसायातून तुम्ही राजकारणाचे धडे गिरवले?
पानपट्टीचा व्यवसाय करीत असताना खऱ्या अर्थाने माझा समाजसेवा, राजकारणाशी संबंध आला. पानपट्टीवर नगरसेवक, मध्यमवर्गीय लोक ते अधिकाऱ्यापर्यंत सर्व जण यायचे. या सर्वांसोबत संवाद होत असायचा. त्यातून माझा जनसंपर्क वाढला. पुढे १९९७ मध्ये पालिका निवडणुकीत अजित पवार यांनी उमेदवारी दिली. ज्या वार्डातून उभा राहिलो तेथे माझे घर नव्हते, तरीही भरघोस मतांनी निवडून आलो. त्यानंतर २००९ मला विधानसभेचे तिकीट दिले आणि आमदार झालो. २०१४मध्ये मोदी लाटेत पराभूत झालो. हा अपवाद वगळता तिन्ही टर्मला मताधिक्य वाढले. १५ वर्षे नगरसेवक होतो. स्थायी समितीचा अध्यक्षही झालो.

कामकाजाची सुरुवात कशी केली?
आता माझी विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली. माझ्या कामाची सुरुवात चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून केली. बाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत येऊ शकलो, याची जाणीव आहे. यासोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरही आदरांजली वाहिली. 

अजित पवारांसोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे न्याय मिळाला का?
अजित पवार यांच्या कामाच्या पद्धतीचे कायम आकर्षण राहिले आहे. १९९९ पासून त्यांच्यासोबत आहे. पक्षात फूट पडली त्या वेळी त्यांच्याशी एकनिष्ठ होतो. ते सार्वजनिकरीत्या जाहीर केले होते. त्यांच्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या महत्त्वाच्या  घटनात्मक पदावर संधी मिळाली आहे. मी या संविधानिक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. सोबत पक्षाचा विस्तार अधिक होण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. 

सभागृह चालवण्याचा तुमचा काय अजेंडा आहे? 
तीन टर्म विधानसभा सदस्य आहे. त्यामुळे सभागृहाचे नियम, कर्तव्ये आणि अधिकारांची चांगली जाण आहे.  संसदीय आयुध, नियम आणि माझे अधिकार वापरून या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब, बहुजन, वंचितांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच नव्या आमदारांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी मिळेल, यासाठी प्रयत्न करेन.

पक्षीय हेवेदाव्‍याच्या वातावरणात तटस्थपणे कामकाज कसे चालवणार?
उपाध्यक्षाच्या खुर्चीवर बसलो की माझ्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष एकसारखेच आहेत. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही असेच सभागृहाचे कामकाज चालवणार आहे. सर्व पक्षांत माझे मित्र आहेत. विरोधी पक्षांचे विजय वडेट्टीवार, नाना पटोले, भास्कर जाधव यांनी मला सन्मानाने व्यासपीठावर नेले. मला सर्वांनी बिनविरोध निवडून दिले आहे. त्यामुळे मी कुठल्या पक्षाचा सदस्य आहे, ही वेगळी बाब आहे. मनात आकस न ठेवता सर्व सदस्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न असेल.  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची महत्त्वाची दोन पदे पुण्याला मिळाली आहेत. तीन दशकांनंतर पिंपरी-चिंचवडला कॅबिनेट दर्जाचे पद मिळाले आहे. अजित पवार यांना पिंपरी-चिंचवड शहराबद्दल एक आत्मीयता आहे.
----
विधानसभेला विरोधी पक्षनेता कधी मिळणार?
लोकशाहीत राज्य चालवत असताना सत्ताधारी आणि विरोधक ही रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता असावा, असे माझे मत आहे. खरेतर बुधवारीच राज्याला विरोधी पक्षनेता मिळाला असता; पण काही कारणाने ते होऊ शकले नाही. विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे राज्याला लवकरच विरोधी पक्षनेता मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com