बॉक्साईट उत्खननाविरोधात एकवटले नागरिक

बॉक्साईट उत्खननाविरोधात एकवटले नागरिक
Published on

बॉक्साईट उत्खननाविरोधात एकवटले नागरिक
श्रीवर्धन तालुक्यातील वनसंपदा, जैवविविधता धोक्‍यात; मदगड किल्ला ढासळण्याच्या मार्गावर


समीर रिसबूड ः सकाळ वृत्तसेवा
श्रीवर्धन, ता. ३० ः श्रीवर्धन तालुक्यातील प्रदूषणकारी बॉक्साईट उत्‍खनानाविरोधात जारे, कुरवडे, गुळधे, वांजळे, मामवली, शेखाडी, भरडोली, गडबवाडी, बापवली, मेघरे येथील ग्रामस्थ एकवटले असून, मायनिंग प्रकल्प लवकरात लवकर बंद व्हावेत, अशी मागणी केली जात आहे. बेसुमार उत्खननामुळे श्रीवर्धन तालुका पोखरला जात असून, मदगड किल्लाही ढासळण्याच्या स्‍थितीत आहे.
निसर्गरम्य श्रीवर्धन तालुक्यात नारळ, रोठा सुपारी, आंबा, काजू या बागायती पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. साधारण २०१० पासून तालुक्यात बॉक्साईट मायनिंग कंपन्यांनी खनिज उत्खनन सुरू केले. खनिज खाणपट्ट्याचे क्षेत्रफळ जास्त असल्याने सध्या बेसुमार उत्‍खनन सुरू असून, यासाठी वापरण्यात येणारी स्फोटके, बॉक्साईटचे तुकडे करताना उडणारा धुरळा यांमुळे वनसंपदेबरोबरच जैवविविधता तसेच नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.
बेसुमार उत्खननामुळे बागायती पिकांवर धूलिकण उडत असल्‍याने पिकाची गुणवत्ता खालावत आहे. ग्रामस्थांना श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या झऱ्यांची दिशा बदलली आहे. त्‍यामुळे विहिरी कोरड्या पडू लागल्‍या आहेत. बॉक्साईट उत्खननावर भविष्‍यात पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्‍यता आहे.

दोन्ही मोर्चांना नाकारली परवानगी
श्रीवर्धन तालुक्यातील बॉक्साईट प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी नुकतेच मोर्चाचे आयोजन केले होते. सोमजादेवी पटांगण ते उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र याच स्‍थानिकांनी मायनिंग कंपन्यांना वाहने भाडेतत्त्वावर दिली आहेत, ते वाहन मालक-चालक ही मोर्चा काढणार होते. दोन्ही गटाला वादविवादाचे स्वरूप येऊ नये तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता दोन्ही मोर्चांची परवानगी नाकारण्यात आली. प्रत्यक्षात श्रीवर्धन तालुक्यात बॉक्‍साईड उत्‍खननासाठी वापरण्यात येणारी ९० टक्‍के वाहने रायगड जिल्ह्याबाहेरील असल्‍याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.

मदगडवरून परिसराची टेहळणी
वांजळे व खुजारे पठारे या डोंगरालगत मदगड किल्ला आहे. सुरुंग स्‍फोट व उत्खननामुळे किल्ल्याच्या पायथ्‍याची जमीन भुसभुशीत झाली आहे. त्‍यामुळे किल्ला कधीही ढासळू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मदगड किल्ल्यावरून मुरूड, दिघी, वडवली, वेळास, बोर्ली-पंचतन, श्रीवर्धन, बागमांडला, हरिहरेश्वर या गावांची टेहळणी केली जायची. संरक्षणाच्या दृष्टीने मदगड किल्ला महत्त्वाचा होता.

शेखाडी ग्रामपंचायत हद्दीत बॉक्साईट कंपनी मायनिंग प्रकल्प सुरू करीत आहे. या विनाशकारी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र दिले आहे.
- बबन पाटील, सरपंच, शेखाडी

बॉक्साईट हे मुख्य खनिज प्रकारातील असल्‍याने उत्‍खननासाठी केंद्राकडून परवानगी दिली जाते. त्यामुळे उत्खननावरील नियंत्रण आमच्याकडे नाही. त्‍याच्या रॉयल्टी निश्‍चितीची जबाबदारी नागपूर येथील खनिकर्म विभागास आहे. शेतकऱ्यांनी प्रकल्‍पाविरोधात निवेदन दिले आहे. त्याची प्रत रायगड जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर कार्यालयाकडे पाठवली आहे. उत्खनन होत असलेल्या एकाही गावाचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील यादीत नाही. वास्तविक खनिज उत्खननाची परवानगी २००१ मध्ये मंत्रालय स्तरावरून देण्यात आली आहे. या कंपन्यांकडून प्रमाणापेक्षा जास्त उत्खनन झाल्याने मध्यंतरी उत्खननास बंदी घालण्यात आली होती.
- महेंद्र वाकलेकर, तहसीलदार, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com