अ
Published on

जिल्हा परिषदेच्या कामकाजाची तटकरे यांच्‍याकडून पाहणी
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) ः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला भेट दिली. जिल्हा परिषदेची जुनी प्रशासकीय इमारत जीर्ण झाल्याने सर्व विभाग कार्यालये अलिबाग शहरातील कुंटे बाग येथे स्थलांतर करण्यात आली आहेत. स्थलांतरित कार्यालयाची पाहणी या वेळी तटकरे यांनी केली. या वेळी आदिती तटकरे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे कौतुक करीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे अभिनंदन केले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे नुकत्याच अलिबागमध्ये नियोजित बैठकीसाठी आल्या होत्या. बैठक आटोपल्यानंतर त्यांनी कुंटे बाग येथे जिल्हा परिषदेला भेट दिली. या वेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग कार्यालयांमध्ये जाऊन पाहणी केली. प्रशासकीय इमारत जीर्ण झाल्यानंतर कुंटे बाग येथे एकच परिसरात उत्तमरीत्या सर्व विभागांच्या कार्यालयांचे स्थलांतर करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच एकाच विभागात सर्व कार्यालये असल्याने ग्रामीण भागातील जनतेला ते सोयीचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता राहुल देवांग, आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
.................
सुधागड पंचायत समितीला आयएसओ मानांकन
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील सुधागड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्या हस्ते पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी लता मोहिते यांना गुरुवारी (ता. २७) आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले‌. विशेष म्हणजे आयएसओ मानांकन मिळवणारी सुधागड पंचायत समिती रायगड जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.
शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी, यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स, फॉर्म्स, दस्तऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतीकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींच्या कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मित करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे, यासाठी कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पंचायत समिती व ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.‌ सुधागड पंचायत समिती प्रशासनाने कार्यालयाचे सुशोभीकरण, पंचायत समितीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे नियोजन, सभेत नियमित विषयांवर चर्चा, वृक्षारोपण करणे यासह शासकीय योजना राबविण्यावर भर दिला जात आहे.
जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समिती व ग्रामपंचायतींना आयएसओ करण्यासाठी व्ही. एन. टेक्नो. रिसर्च प्रा. लि. कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्या हस्ते पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले‌. पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश घरत, तालुका कृषी अधिकारी मिलिंद चौधरी, विस्तार अधिकारी सुनील आहेर, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजन थळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com