

गौतमनगर रहिवाशांना वांद्रे पूर्वेत हक्काची घरे
आमदार वरुण सरदेसाई यांचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः वांद्रे पूर्वेतच हक्काची घरे मिळणार असल्याने गौतमनगरच्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. वांद्रे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या गौतम नगर समता सेवा संघाच्या रहिवाशांना वांद्रे परिसर सोडून मालाडला स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवली होती. या सर्व रहिवाशांनी याबाबत आमदार वरुण सरदेसाई यांना वांद्रे परिसरातच घरे मिळवून देण्याबाबत विनंती केली.
स्मार्ट सिटीअंतर्गत उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी भूखंड आरक्षित केल्याने रहिवाशांचे राहत्या घरांचे निष्कासन करण्याबाबत नोटीस प्राप्त झाली होती. रहिवाशांना मालाड, आप्पापाडा या ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी घरांची लॉटरी सोडत काढली असल्याचे येथील रहिवाशांनी ‘आमदार आपल्या दारी’ कार्यक्रमावेळी आमदार वरुण सरदेसाई यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
वरुण सरदेसाई यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासोबत ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन वांद्रे परिसरातच पुनर्वसन करण्याबाबत विनंती केली. त्यानंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सर्व रहिवाशांचे वांद्रे परिसरातच पुनर्वसन करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना आदेश दिले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनदरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत २० मार्च रोजी बैठक झाली. सरदेसाई यांनी गौतमनगर समता सेवा संघाचे पुनर्वसन वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी येथील ओम साई सीएचएस एसआरएच्या इमारतीमध्ये रिकाम्या असलेल्या सदनिकांमध्ये करण्याबाबत विनंती केली. त्यानंतर सदनिका वाटप करण्याबाबत झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना आदेश देण्यात आले. दरम्यान, आमदार वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील या विषयासंदर्भात भेट घेतली होती. हक्काची घरे मिळवून दिल्यानंतर गौतमनगर समता सेवा संघाचे रहिवासी राकेश ढिल्लोड, राजन मोरे, दीपाली येवले, प्रवीण सागवेकर, अविनाश पवार, इस्माईल कुरेशी यांच्यासह सर्व रहिवाशांनी आमदार वरुण सरदेसाई यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.