पान ६ पट्टा बातमी

पान ६ पट्टा बातमी
Published on

नऊ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील मौजे खोपिवली गावचा युवा कार्यकर्ता तथा ग्रामपंचायत सदस्य मुकुंद कराळे यांनी ग्रीन सोल कंपनी मुंबई व वरळी कंपनीच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास नऊ हजार विद्यार्थ्यांना मोफत दप्तरे, चपला व बसण्यासाठी चटई आदी शालोपयोगी साहित्याचे वाटप केले आहे. नुकतेच तालुक्यातील मौजे आगाशी या गावी ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. हे सर्व करताना मोरेश्वर मोहपे यांचे फार मोठे योगदान होते, असल्याचे मुकुंद कराळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या वेळी येथील ग्रामस्थांनी हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे प्रभाकर शेळके, गुरुनाथ शेळके, मोरेश्वर मोहपे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलाकर शेळके, दवणे, कुळाला, दीपक शेळके, उमेश तरे, भगवान शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
मुरबाड : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी मुरबाड येथील पत्रकार शंकर करडे यांची, तर मुरबाड तालुका अध्यक्षपदी दिलीप पवार यांची निवड करण्यात आली आहे. मुरबाड येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे नुकताच हा समारंभ पार पडला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार मुरबाड येथे झालेल्या बैठकीत प्रदेश संघटक नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. या वेळी ठाणे जिल्हा पदाधिकारी व मुरबाड, शहापूर, कसारा, भिवंडी, कल्याण ग्रामीण तालुका पदाधिकाऱ्यांनासुद्धा नियुक्तिपत्रे देण्यात आली.

मुरबाड : येथे झालेल्या सभेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली.

पोलिसांना तणावमुक्त जीवनासाठी मार्गदर्शन
मुरबाड (बातमीदार) : मुरबाड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान धारणेचा मंत्र कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. मुरबाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. डॉ. पुरुषोत्तम भाईजी यांनी स्ट्रेस फ्री लिविंग या विषयावर मार्गदर्शन करताना आनंदी राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. या वेळी बीके वैशाली दीदी यांनी पोलिसांना ब्रह्माकुमारी सेंटरवर येऊन ध्यान धारणाचे शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
मुरबाड : येथे पोलिसांसाठी ध्यान धारणा मंत्र कार्यक्रमात पोलिस सहभागी झाले होते.


वासिंदमध्ये उबाठाला खिंदार
शहापूर : शिवसेनेच्या उबाठा गटाचे वासिंद येथील सरपंच राजेंद्र म्हसकर, उपसरपंच राजेंद्र विठ्ठल भेरे आणि खानिवली येथील माजी सरपंच शेखर दळवी यांच्याबरोबरच उबाठा गटाच्या सुमारे १५० शिवसैनिकांनी दिवेअंजुर येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या कार्यक्रमाला भाजपचे शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, काळुराम धनगर, गणेश राऊत, अनिल शेलार, वासुदेव काठोले, प्रशांत खर्डीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या कार्यामुळे प्रभावित होऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू कर्मचाऱ्यांना विकल्पासाठी मुदतवाढ
भिवंडी, ता. ३० : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना विकल्प देण्याकरिता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना आपला विकल्प देण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत असणार आहे. हे शिक्षण क्रांती संघटनेने केलेल्या मागणीचे यश आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी दिली आहे.२० सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळेचा विकल्प हा ३१ मार्चपर्यंत संबंधित कार्यालय प्रमुखांकडे सादर करण्यासाठी मुदत होती, परंतु घाईघाईने विकल्प देणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे पात्र कर्मचारी संभ्रमित झाले होते. त्यामुळे शासन स्तरावर निर्णय होऊन हा विकल्प निवडण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेकडून पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या वतीने २८ मार्च रोजी विशेष अध्यादेश काढून हा विकल्प सादर करण्यासाठी तब्बल एक वर्षाची मुदत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com