रायगड०१

रायगड०१
Published on

एकाच दिवशी सहा घरफोड्या
रोहा, ता. ३० (बातमीदार) ः शहरातील गजबजलेल्या लोकवस्तीत एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोड्या झाल्‍याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात नागरिक भीतीच्या छायेत आहेत. बुधवार (ता. २६) सायंकाळी रोहे शहरातील नेहरूनगर येथील प्लॅटमध्ये, अष्टमी नाक्यावरील नवीन वसाहतीतील तीन घरे तसेच भुवनेश्वर येथील चैतन्य अपार्टमेंटमधील दोन घरांचा कडीकोयंडा तोडून कपाटामधून जवळपास सहा लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम लंपास केली.
अष्टमी नाक्यावर फ्लॅटमध्ये घरफोडी करण्यापूर्वी शेजाऱ्यांना कळू नये, म्‍हणून इतर सर्व घरांना बाहेरून कडी लावून सीसीटीव्‍हीवर स्टिकर चिटकवून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. एकाच दिवशी सहा घरफोडीचे धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अलिबाग येथून श्वान पथक व ठसे तज्‍ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत रोहा पोलिस ठाण्यात राजेंद्र पांडुरंग गुरव यांनी तक्रार दाखल केली असून, निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आनंद रावडे तपास करीत आहेत.

------------

विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास अटक
रोहा (बातमीदार) ः गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना रोह्यातील चणेरा परिसरातील खासगी शाळेत घडली. वर्गातील सहा विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाविरोधात रोहा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्‍यावर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. अनिल कुंभार असे शिक्षकाचे नाव आहे. २४ मार्चला न्यू इंग्लिश शाळेत वर्ग सुरू असताना, सहा विद्यार्थिनींशी गैरवर्तन करून त्‍याने विनयभंग केला. त्‍यामुळे भयभीत झालेल्‍या मुलींनी घरी आल्‍यावर याबाबत आई व इतर नातेवाइकांना शाळेत घडलेला प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात तक्रार करताना शिक्षकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्‍यात घेण्यात आले.

...........

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अश्लील हावभाव
कर्जत (बातमीदार)ः पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणीशी अश्लील हावभाव करणाऱ्या एकास नेरळ पोलिसांनी काही तासांत बेड्या ठोकल्या. नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिकसळ येथील रायगड रुगणालयासमोर कर्जत-कल्याण राज्य मार्गावर हा प्रकार घडला होता, मात्र पळून गेलेल्या आरोपीचा नेरळ पोलिसांनी काही तासांत शोध घेत अटक केली. आरोपी बदलापूर-सोनिवली येथे राहण्यास असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. २५) रात्री डिकसळ येथील रायगड रुग्‍णालयात कार्यरत महिला कामावरून घरी जाण्यासाठी भिवपुरी रोड स्थानकाच्या दिशेने निघाली होती. त्या वेळी भाऊसाहेब राऊत शाळेजवळ मुख्य रस्‍त्‍यावर एका दुचाकीस्‍वाराने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले. आजूबाजूला कोणी नसल्‍याचा फायदा घेत तिच्याशी अश्लील हावभाव केले. नंतर तिने थेट नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी, महिला पोलिस उपनिरीक्षक प्राची पागे यांना गुन्ह्याचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी त्वरित चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा दुचाकी क्रमांक मिळवला. तसेच कर्जत, डिकसळ, पेट्रोलपंप, हुतात्मा चौक, नेरळ पोलिस ठाणे, आणि शेलू परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीचा माग लागला. त्यानंतर तातडीने कारवाई करत मध्यरात्री दोन वाजता छापा टाकत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. विजय चंद्रकुमार तेलगर (वय ३४) या त्‍याचे नाव असून, त्‍याची दुचाकीही जप्त केली आहे.

..................

आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
म्हसळा (बातमीदार) ः तालुक्यातील खामगाव गौळवाडी येथे राहणारे सुदाम बारक्या वाजे (७०) यांनी आजारपणाला कंटाळून गुरुवारी (ता. २७) सायंकाळी राहत्‍या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुदाम यांची पत्‍नी सुधा (६०) यांनी याबाबत म्‍हसळा पोलिसांना माहिती दिली. सुदाम वाजे यांना चार वर्षांपूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता, तेव्हापासून ते आजारी होते. आजारपणाला कंटाळून नैराश्याने घरातच नायलॉन दोरीने गळफास घेत आत्‍महत्‍या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com