

वाशी, ता. ३० (वार्ताहर) : मराठी नववर्ष आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त वाशीत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण वाशी परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषा करीत मोठ्या प्रमाणात नागरिक उत्साहात या शोभायात्रेत सहभागी झाले होते. वाशी सेक्टर २८ मधील स्वामीनारायण गुरुकुल इथून सुरू झालेल्या या शोभायात्रेचा समारोप महात्मा गांधी कॉम्प्लेक्समार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला.
दरवर्षीप्रमाणे वाशीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला-पुरुष, तरुण-तरुणी आणि दुचाकीस्वार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी नेसून भगवे फेटे परिधान केले होते. नथ, गॉगल लावत पारंपरिक वेशभूषेला मॉडर्न साज चढवत महिला दुचाकीवर स्वार झाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीवरील भगवे ध्वज मोठ्या डौलाने फडकत होते. ढोल-ताशांच्या गजराने वातावरण अगदी दुमदुमून गेले होते. या वेळी जय जिजाऊ लेझीम पथकातील तरुणींनी लेझीमची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. यासोबतच विविध हिंदू देवी-देवतांचे वेष परिधान केलेले नागरिकदेखील या शोभायात्रेत लक्ष वेधून घेत होते.
----------------
दाक्षिणात्य संस्कृतीचा मिलाफ
महत्त्वाची बाब म्हणजे गुढीपाडवा हा सण मराठी नववर्ष म्हणून साजरा करण्यात येत असला तरी नवी मुंबईतील दाक्षिणात्य समाजदेखील आपल्या पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांसह या शोभयात्रेत सहभागी झाला. त्यामुळे महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य संस्कृतीचा सुंदर मिलाफ यानिमित्ताने उपस्थितांना अनुभवता आला.
--------
अभिजात मराठीचा विशेष चित्ररथ
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे. यानिमित्ताने शोभायात्रेत सावरकर विचार मंचने विशेष चित्ररथ तयार केला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले अस्सल मराठी शब्द मांडण्यात आले होते. यंदाच्या गुढीपाडव्यात या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
----------------
महिलांसाठी विशेष स्पर्धा
शोभायात्रेदरम्यान महिलांसाठी विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. लकी ड्रॉमध्ये दोन ग्रॅम सोने आणि ११ पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. त्यामुळे महिलांमध्ये मोठा उत्साह होता. भगवे फेटे आणि पारंपरिक साज-शृंगार करून महिलांनी शोभायात्रेत सहभाग घेतला होता. ढोल-ताशांच्या गजरात महिला पारंपरिक गाण्यांसह टाळ-मृदुंगाच्या साथीने ताल धरताना पाहायला मिळाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.