

पनवेल, ता. ३० (बातमीदार) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा मंगळवारी पनवेल आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा प्रारंभ करण्यासाठी व खरेदीसाठी उत्तम मुहूर्त समजला जातो. या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभ्या करून तोरण लावून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरुवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी केल्या जातात. दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचे प्रतीक साजरे केले जाते. पनवेलमधील ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत महिलांसह बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्त्रियांनी यामध्ये सहभाग घेतला होता. काही विरांगना घोड्यावर बसून रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. रॅलीदरम्यान काढण्यात आलेल्या चित्ररथामध्ये मलखांबाची प्रात्यक्षिके सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रॅलीदरम्यान वेशभूषा २०२५चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करून शेकडो लहान मुले-मुली व महिला यांनी सहभाग घेतला होता. पनवेलच्या वडाळे तलावावरून शोभायात्रेला सुरुवात होऊन सदाशिव पेठ म्हणून समजल्या जाणाऱ्या टिळक रोडवरून सावरकर चौक येथे समाप्त झाली. या मार्गावर अनेक ठिकाणी स्थानिकांकडून शोभायात्रेतील सहभागी नागरिकांसाठी पेढे, पाणी, सरबत, आईस्क्रिम, श्रीखंड, नाश्ता, पन्हे, कोकम सरबत देऊन शोभायात्रेचे स्वागत केले.
-----------------
नानाविध वेशभूषांनी वेधले लक्ष
पनवेल येथील लोकमान्य नगरमधील चिमुकल्यांनी संतांची मांदियाळी या विषयावर वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये राधा, कृष्ण, संत तुकाराम, नामदेव, संत जनाबाई इत्यादी संतांची वेशभूषा केली होती. अंतराळवीर कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. क्रांतिवीर खाजा नाईक, तंट्या भिल्ल, जननायक राघोजी भांगरे, वीर तल्लकल चंदू, हुतात्मा पद्या ठाकूर या पनवेल परिसरातील क्रांतिकारकांच्या वेशभूषेने पनवेलकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
---------------
कळंबोलीत जेसीबीमधून पुष्पवृष्टी
गुढीपाडवा सांस्कृतिक व सामाजिक सेवा संस्था कळंबोली यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त सकाळी आठ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कळंबोलीमधील चौकाचौकात शोभायात्रेवर जेसीबीतून फुलांची उधळण करत कळंबोलीकरांनी स्वागत केले. लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावरील मूर्तीचा चित्ररथ सजवण्यात आला होता. पारंपरिक वेशभूषेतील मुले, मुली, महिला व शेकडो नागरिकांच्या सहभागातून शोभायात्रा भव्य स्वरूपात काढण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष शहाजी धुमाळ, सचिव उद्धव कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
-----------------
पनवेलमध्ये साकारली महाकुंभनगरी
भारतीय संस्कृतीचा प्राचीन वारसा जपण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेलमध्ये शोभायात्रेच्या स्वागतप्रसंगी साकारलेली महाकुंभनगरी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या अनोख्या उपक्रमाने नागरिकांना हिंदू नववर्षाचा एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव मिळत होता. समस्त हिंदू नूतन वर्ष शोभायात्रा समिती, आमदार विक्रांत पाटील आणि सहकाऱ्यांनी सर्व पनवेलकर नागरिकांचे जल्लोषात महाकुंभनगरीत स्वागत केले. कुंभमेळ्यातील भव्य महादेवाची प्रतिकृती, साधू-संतांच्या प्रतिकृतीवर जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.