चित्ररथात साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती

चित्ररथात साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती
Published on

चित्ररथात साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : गुढीपाडव्यानिमित्त कल्याण पश्चिमेला निघालेल्या नववर्ष स्वागत यात्रेत शाडूच्या मूर्ती बनविणाऱ्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कल्याण-डोंबिवली महापालिका आणि मनुसृष्टी या पर्यावरणविषयक संस्थेने हा चित्ररथ साकारला होता. गुढीपाडव्यानिमित्त कल्याण पश्चिम विभागात मोठ्या स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत यात्रेत अगदी शेवटच्या क्रमांकावर असलेला चित्ररथ मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या चित्ररथात कल्याणमधील शाडूच्या मूर्ती बनविणारे मूर्तिकार होते. या मूर्तिकारांनी एक तासाच्या कालावधीत तीन शाडूच्या गणेशमूर्ती साकारल्या. यातील दोन गणेशमूर्ती या थेट हाताने बनवल्या, तर एक मूर्ती साच्याचा वापर करून बनवण्यात आली.

मनुसृष्टी संस्थेच्या वैशाली तांबट म्हणाल्या की, “पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठीची उच्च न्यायालयाने नेमून दिलेली नियमावली पाळली जात नाही. तसेच यंदा माघी गणेशोत्सवावेळी पीओपी मूर्ती बनविण्यावर मुंबई महापालिकेने बंदी घातल्याचे आपण पाहिले होते. त्यामुळे कल्याणमध्येही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी महापालिकेने आतापासूनच जनजागृती करण्याचे निश्चित केले. त्यासाठी आम्हीही पुढाकार घेत हा चित्ररथ साकारला. यात शाडूची मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठीच हा प्रयत्न केला आहे. आतापासून जनजागृती झाली, तर गणेशोत्सवात मूर्तिकारही शाडूच्या मूर्ती बनवतील आणि लोकही त्या मूर्तींना पसंती देतील.” यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या लोकरे यांनी सहाकार्य केल्याचे तांबट यांनी सांगितले.

सतत पुढे जाणारा चित्ररथ आणि आजूबाजूला शांतता नसतानाही हेमंत इश्वद, अतुल खामकर, समीर येळेकर, पिंटो जैस्वाल, गणेश गव्हाणकर, नितीन कुंभार, मंदार घोडके, सचिन तुपगावकर आदी मूर्तिकरांनी अत्यंत कमी वेळात या शाडूच्या गणेशमूर्ती साकारल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com