

वरळीत भव्य गुढीपाडवा शोभायात्रा
परंपरागत वाद्ये, मर्दानी खेळ, लेझीम पथकांनी वेधले लक्ष
मुंबई, ता. ३० ः हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीने ‘आम्ही वरळीकर’ या संकल्पनेतून भव्य गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन रविवारी (ता. ३०) करण्यात आले होते. यंदाचे पंधरावे वर्ष असलेल्या या सोहळ्याचा उत्साह अनोखा होता.
सकाळी ८ वाजता परंपरागत वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, आकर्षक गुढ्या आणि विविध देखाव्यांसह ही शोभायात्रा मोठ्या जल्लोषात पार पडली.
यावर्षीच्या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे आपल्या मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा. या गौरवाच्या निमित्ताने शोभायात्रेत सहभागी प्रत्येक शालेय विद्यार्थी आणि महिलांना उपयुक्त मराठी पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. तसेच वरळी विभागातील स्थानिक मराठी लेखक, कवी आणि पत्रकार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वारकरी भजनी मंडळांचा भक्तिमय गजर, महिला लेझीम पथकाने सादर केलेले विलोभनीय प्रदर्शन, साई पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक, ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य चित्ररथ, रामायणातील राम-सीता यांच्या जीवनदर्शनाचा देखावा या विविध देखाव्यांमुळे इतिहास, भक्ती आणि संस्कृती यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
विशेषतः तरुण-तरुणींनी पारंपरिक मराठमोळ्या वेशात, अभिमानाने फेटे परिधान करून सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेतील नागरिक भगव्या ध्वजांसह सहभागी होऊन ढोल-ताशांच्या निनादात संपूर्ण वरळी परिसर दणाणून गेला.
अधिकाधिक मराठी भाषा व वर्तमानपत्रे वाचावीत यासाठी मराठी भाषेतील घोषवाक्य, पंचलाइन आणि प्रेरणादायी फलक तयार करण्यात आले. ‘मराठी वाचा, मराठी बोला, मराठी लिहा’ हा संदेश प्रभावीपणे देण्यासाठी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी असे फलक शोभायात्रेत प्रदर्शित केले. हा उपक्रम मराठी भाषेच्या जास्तीत जास्त प्रसार आणि वृद्धीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले.
भव्य शोभायात्रा ऐतिहासिक जांबोरी मैदान येथून सकाळी ८ वाजता सुरू झाली आणि डाॅ. जी. एम. भोसले मार्ग येथे संपूर्ण उत्साहात पार पडली. तसेच राजकीय क्षेत्रातील आमदार, खासदार, नगरसेवक व मराठी सिनेकलाकारांची उपस्थिती लाभली.
शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कदम म्हणाले की, गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा अभिमानाचा दिवस आहे. यंदा मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने आम्ही या शोभायात्रेत विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक देखावे सादर करून एक आगळा-वेगळा सोहळा साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सामाजिक संस्था, वरळीतील मंडळे, ट्रस्ट, राजकीय संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय बनवला, याबद्दल सर्वांचे कदम यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.