पुन्हा कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध

पुन्हा कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध
Published on

ठाणे महापालिकेची कचराकोंडी कायम

कशेळी, मुल्लाबागच्या हस्तांतर केंद्रांस विरोध; स्थानिकांची दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : महापालिका हद्दीत पुन्हा कचऱ्याचा प्रश्‍न डोके वर काढू लागला असून, ही समस्या सोडविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ४) कशेळी आणि मुल्लाबाग येथे कचरा हस्तांतर केंद्र सुरू करण्यास गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. या वेळी जेसीबीवर काही जणांनी दगडफेक केली. या वादावर तोडगा काढण्यासाठी स्थानिकांसह लोकप्रतिनिधींचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने अखेर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना माघारी फिरावे लागले.

डायघर येथील डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याने त्याचा ताण सीपी तलाव येथील हस्तांतर स्थानकावर आला होता. सीपी तलाव कचरा प्रकल्पावरील वाढता ताण कमी करण्यासाठी भिवंडीतील आतकोली येथे पालिकेने कचरा टाकण्यास सुरुवात केल्याने काही प्रमाणात शहरातील कचऱ्याची समस्या आटोक्यात आली होती. काही दिवसांपासून पुन्हा शहराच्या विविध भागांत नाक्यावर कचऱ्याचे ढीग साचत आहेत. गृहसंकुलांच्या ठिकाणीदेखील तीन ते चार दिवसांपासून कचरा उचलला गेला नसल्याने पुन्हा दुर्गंधी वाढली आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील इतर ठिकाणीदेखील तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतर केंद्र तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांनी विरोध केल्याने पालिकेला ते सुरू करता आले नाही.

शुक्रवारी ठाणे पालिका प्रशासनाने ठाण्यातील मुल्ला बाग येथे तात्पुरत्या स्वरूपात कचरा हस्तांतरण केंद्र सुरू करण्यासाठी तेथे दोन जेसीबी, सहा डम्पर तैनात केला होते; मात्र तेथे स्थानिक लोकप्रतिनिधीसह स्थानिकांनी विरोधाची भूमिका घेतली. त्यानंतर पालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये बचाबाचीही झाली. या वेळी जेसीबीवर दगडफेकदेखील करण्यात आली, तर एका नागरिकाने जेसीबीसमोर झोपून आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे हतबल झालेल्या पालिका प्रशासनाला रिकाम्या हाताने तेथून परतावे लागले.
..................................
कचरा समस्या मार्गी लावायची कशी?
मुल्लाबाग येथे कचरा हस्तांतर केंद्र सुरू करण्यास स्थानिकांनी विरोधाची भूमिका घेतली. त्या वेळी पालिका प्रशासनाने हा कचरा वर्तकनगर प्रभाग समितीतील असून शहरातील इतर भागातील नसल्याचे स्पष्ट केले. त्यालादेखील स्थानिकांनी विरोध केला. त्यानंतर प्रशासनाने प्रभाग चारमधील कचरा हस्तांतर करण्यास विनंती केली असता, तेथेही स्थानिकांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कचराप्रश्न मार्गी लावायचा कसा, असा सवाल करून उपाय सुचविण्याचे आवाहनदेखील प्रशासनाने नागरिकांना केले.
......................
वर्तकनगर प्रभाग समितीत ९० टन कचरा
ठाणे पालिका क्षेत्रातील वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत ९० टन कचरा प्रतिदिन निर्माण होतो. हा कचरा नऊ ते १० घंटागाड्यांच्या माध्यमातून उचलण्यात येत असतो. त्यानुसार मुल्लाबाग येथील हस्तांतरण केंद्रावर येणाऱ्या घंटागाड्यांतील कचरा उचलण्यासाठी सहा ते सात डम्पर सज्ज ठेवण्यात आले होते, अशी माहिती पालिका उपयुक्त मनीष जोशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com