

ठाणे जिल्ह्यात पाऊस, धुळीचे वादळ
जनजीवन विस्कळित; पालघर, रायगडला अवकाळीचा तडाखा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना शुक्रवारी (ता. ४ ) दुपारी अचानक अवकाळी पावसाने तडाखा दिला. ठाणे जिल्ह्यात शहापूर, मुरबाड, उल्हासनगर परिसरात वादळीवाऱ्यांसह पाऊस झाला. त्याचवेळी ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली, कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर परिसरात धुळीचे वादळ आल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने सर्वसामान्यांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
राज्यात विविध भागांत ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण परिसरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी चार वाजता अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे जिल्हातील शहर आणि ग्रामीण परिसराला काही वेळ धुळीने वेढले होते. त्यामुळे वातावरणातील दृश्यमानता कमी झाली होती. कल्याणजवळ आंबिवली स्थानक परिसरात झाड कोसळून पाच दुचाकींचे नुकसान झाले. शहापूरजवळ मुंबई-नाशिक मार्गावर विजेच्या तारा रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळ थांबली होती, तर तानशेत रेल्वेस्थानकात वाऱ्यामुळे लोकलवर पत्रा पडल्याची घटना घडली.
ठाणे शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नौपाडा, मानपाडा आणि पवारनगर तीन झाडे उन्मळून पडली, तर नौपाडा परिसरात झाड पडून तीन दुचाकींचे नुकसान झाले. जुन्या कळवा खाडी पुलावर विद्युत लाईटचा पोल ही मधोमध तुटून पडला. तसेच ठाणे स्टेशन परिसरातील धोकादायक झालेला दिशादर्शक फलक हटवण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थानाने दिली.
बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चारच्या सुमारास वतावरणात अचानक बदल होऊन वादळी वारा सुरू होऊन सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.