पंधरा वर्षांपासूनचा घराचा संघर्ष संपला!

पंधरा वर्षांपासूनचा घराचा संघर्ष संपला!
Published on

पंधरा वर्षांपासूनचा घराचा संघर्ष संपला!
पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्पात सदनिका निश्चिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आर-९ भूखंडावरील पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांचा सुमारे १५ वर्षांपासूनचा घरासाठी सुरू असलेला संघर्ष आज अखेर संपला. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत पात्र ६६३ सभासदांसाठी संगणकीय सोडतीद्वारे पुनर्वसन इमारतीमधील सदनिकांची निश्चिती केली आहे. त्यामुळे कोणाला कोणत्या इमारतीत, कुठल्या मजल्यावर कोणते घर मिळणार हे निश्चित झाले आहे.
गोरेगाव येथील सरदार वल्लभभाई सभागृहात म्हाडाने संगणकीय सोडत कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संबंधित सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदनिका निश्चितीसाठी म्हाडाने काढलेली संगणकीय सोडत प्रणाली अत्यंत पारदर्शक असून व यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याचे बोरीकर यांनी सांगितले. म्हाडा एक शासकीय उपक्रम असल्याने शासनमान्य पद्धतीनुसारच सदनिकांचे वितरण करणे म्हाडास क्रमप्राप्त ठरते, असेही त्यांनी सांगितले. सोडतीत यशस्वी ठरलेल्या सर्व ६६३ सभासदांना त्यांच्या सदनिकांचे ताबा पत्र व चाव्या सोमवार (ता. ७)पासून वांद्रे येथील म्हाडा गृहनिर्माण भवनातील मुंबई मंडळ गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून प्रदान करण्यात येणार आहेत.
...
सौरऊर्जा यंत्रणा बसवणार
गृहनिर्माण संस्थेच्या मागणीनुसार इमारतीमध्ये सौरऊर्जेची यंत्रणा बसविण्याकरिता म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मान्यता दिली असून याबाबतचे नियोजन मंडळातर्फे सुरू आहे. त्याचबरोबर संस्थेतील व्यायामशाळेकरिता लागणारी उपकरणेदेखील म्हाडातर्फे उपलब्ध करवून देण्यात येणार असल्याचे मिलिंद बोरीकर यांनी या वेळी सांगितले. या प्रकल्पाला १ एप्रिलला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. डीसीपीआरनुसार आवश्यक असलेल्या ४१२ वाहनतळांऐवजी एकूण ६८६ पार्किंग जागा प्रत्येक सदनिकेकरिता एक याप्रमाणे वाहनतळाचे नियोजन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
...
मेअखेर भाडे मिळणार
म्हाडाकडून सभासदांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया जरी सुरू करण्यात येत असली तरी सर्व सभासदांना मे महिन्यापर्यंत भाडे देण्यात येणार आहे. म्हाडातर्फे पात्र सभासदांना जानेवारी २०१८पासून आजतागायत १२९ कोटी रुपये भाडे स्वरूपात अदा करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com