ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचे निधन
Published on

ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचे निधन

मुंबई, ता. ४ ः मराठी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट आणि मालिकांमधून विविध प्रकारच्या भूमिका साकारणारे अभिनेते डाॅ. विलास उजवणे (वय ६१) यांचे आज बोरिवलीतील एका खासगी रुग्णालयामध्ये निधन झाले. त्यांच्यामागे अभिनेत्री पत्नी अंजली तसेच मुलगा कपिल असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. ५) दुपारी मिरा रोड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
डाॅ. विलास उजवणे यांचा जन्म १६ डिसेंबर १९६४ रोजी नागपूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. शाळेत असताना त्यांनी काही बालनाट्ये केली. शाळेत ते हुशार विद्यार्थी होते. क्रिकेट आणि कबड्डी या खेळामध्ये ते चांगलेच पारंगत होते. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथेच झाले. अकरावीमध्ये असताना त्यांनी ‘अज्ञानाला फुटली शिंगे’ या नाटकात काम केले. या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार मिळाला. नागपूर युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी संपादन केली आणि अभिनयाची प्रचंड आवड म्हणून मुंबईचा रस्ता धरला. ‘जनता जनार्दन’ हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकी भूमिका साकारली. त्यानंतर मराठी नाटके, मराठी मालिका आणि चित्रपट असा त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये जवळपास ११० चित्रपट आणि १४० हून अधिक मालिका केल्या आहेत. जवळपास ६७ नाटकांमध्ये त्यांनी काम केले. ‘नाना करते प्यार’, ‘आता माझी सटकली’, ‘आकांत’, ‘लाडकी सून’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’ अशा काही नाटकांबरोबरच ‘राऊ’, ‘अवंतिका’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अग्निहोत्र’, ‘वादळवाट’ या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मालिका कमालीच्या लोकप्रिय ठरल्या. ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘तेजस्विनी’, ‘कुलस्वामिनी’, ‘प्रेमाची लाट लागली वाट’ आदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. दहा ते बारा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. दोनेक वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावर त्यांनी मात करून पुन्हा कामाला सुरुवात केली. आजारपणानंतर त्यांनी ‘कुलस्वामिनी’ हा चित्रपट केला. सतीश रणदिवे, राज कुबेर, संजय सूरकर, मंदार देवस्थळी अशा काही दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले. त्यांचे ‘सोरट’, ‘आभाळ’ आदी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com