अखेर कुरुंदकर फसलाच

अखेर कुरुंदकर फसलाच
Published on: 

...अखेर कुरुंदकर फसलाच
बालपणीच्या मित्राने समोर आणले सत्य
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ५ : गुन्हा करणारे गुन्हेगार कितीही हुशार असले तरी ते गुन्हा करताना काही ना काही पुरावे मागे सोडतात, हे अश्विनी बिद्रे प्रकरणात पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यानंतर साधारण चार महिन्यांनंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. मात्र त्याआगोदरच अभय कुरुंदकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून सगळे पुरावे नष्ट केले होते. विशेष म्हणजे अभय कुरुंदकर याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने आपले वजन वापरून राष्ट्रपती पदकासाठी आपली वर्णी लावून घेतली होती. संशयित आरोपी म्हणून अटक झाल्यानंतरही कुरुंदकर पोलिस कोठडीत त्याच आविर्भावात उत्तरे देऊन पोलिसांच्या प्रश्नांना बगल देत होता. अखेर नवी मुंबई पोलिसांनी त्याच्या बालपणीचा व अत्यंत जवळचा मित्र महेश फळणीकर याच्या तोंडून या प्रकरणामागील सत्य वदवून घेत अखेर या प्रकरणाचा छडा लावला.

अश्विनी बिद्रेची हत्या
अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी रात्री मिरा रोड येथे अश्विनी यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी त्याने मृतदेहाचे तुकडे भरलेली गोण वसई खाडीत फेकून दिली. अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्याने १४ जुलै २०१६ रोजी कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अश्विनी बिद्रे बेपत्ता होण्यामागे कुरुंदकरचा हात असल्याचे उघडकीस आल्यानंतर ३१ जानेवारी २०१७ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलिस आयुक्तांची विशेष कामगिरी
अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी कुरुंदकरला या गुन्ह्यात अटक करून दुसरा आरोपी राजू पाटील याच्या मुसक्या आवळल्या. त्यापाठोपाठ १८ फेब्रुवारी २०१८ रोजी कुंदन भंडारी आणि २४ फेब्रुवारी २०१८ रोजी महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली. या सर्वांची कसून चौकशी झाल्यानंतर १ मार्च २०१८ रोजी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला. संगीता शिंदे अल्फान्सो यांनी या हत्याकांडाचा बारकाईने तपास करून त्याबाबतचे पुरावे न्यायालयापुढे सादर केले होते. त्याच पुराव्यांच्या आधारे या आरोपींना दोषी ठरवले आहे.

पती आणि भावाच्या पाठपुराव्याला यश
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अश्विनीचे पती राजू गोरे व अश्विनीचे लहान भाऊ आनंद बिद्रे या दोघांनी या प्रकरणाचा नियमित पाठपुरावा ठेवला. तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी पोलिसांशी संवाद ठेवला. या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या पाठीमागे कायम ससेमिरा लावला. अखेर त्यांच्या या पाठपुराव्यामुळे आरोपींना शिक्षा झाल्याने राजू गोरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्य पोलिस दलासाठी अत्यंत संवेदनशील प्रकरण
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या बेपत्ता होण्यामागे पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा हात असल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य पोलिस दलासाठी हे प्रकरण अत्यंत संवेदनशील झाले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याच्या पोलिस यंत्रणेचे लक्ष लागले होते. राज्य पोलिस दलासाठी अत्यंत संवेदनशील बनलेले हे प्रकरण अखेर नवी मुंबई पोलिसांनी तडीस नेत आरोपींना अटक केली. अखेर या हत्याकांडातील तीन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवल्याने राज्याच्या गृह विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com