

पेण, ता. १० (वार्ताहर) : तालुक्यातील खारेपाट विभागात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई भेडसावू लागते. सध्या खारेपाटात पेण पंचायत समितीच्या माध्यमातून १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. असे असले तरी वाड्या-वस्त्यांवर टंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या वाशी-वढावमधील यात्रांबरोबरच लग्नसराईकरिता प्रशासनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एप्रिल-मे महिना हा लग्नसराईचा आणि यात्रांचा असून, ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू आहे. पेण पंचायत समितीच्या माध्यमातून २ एप्रिलपासून खारेपाटातील टंचाईग्रस्त भागात पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. या ठिकाणी जवळपास १२ ते १५ टँकरने पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना केवळ १० टँकरने पुरवठा केला जात असल्याने वाड्या-वस्त्यांवरील पाण्याची समस्या ‘जैसे थे’ आहे.
एकीकडे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत, तर दुसरीकडे पाण्यासाठी नागरिकांची भरउन्हात पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने खारेपाटातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी पोहोचवणे आवश्यक आहे. येत्या दोन-चार दिवसांवर तालुक्यातील अनेक भागातील यात्रा उत्सव आले आहेत. त्यात लग्नसराईचेही मुहूर्त आहेत. त्यामुळे परिसरातील पाणीटंचाई लवकरात लवकर दूर होऊन, वाड्या-वस्त्यांवर टँकरने जास्तीत जास्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पेण खारेपाटातील नागरिक अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करत आहेत. सध्या पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने १० टँकर सुरू करण्यात आले आहेत, मात्र ते अपुरे असून, वाशी भागातील जवळपास २१ वाड्या आहे, त्या तुलनेत टँकरची संख्या खूपच कमी आहे. सहा महिने साठवलेला पाणी आता संपले असून, नव्याने टँकरद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने आताच गावागावांत याबाबत जनजागृती करावी तसेच वाशी, वढाव यात्रांबरोबरच लग्नसराई सुरू झाल्याने सुरळीत पाणीपुरवण्यासाठी प्रयत्न करावेत.
- गोरख पाटील, माजी सरपंच, वाशी
पेण-खारेपाट विभागाला जवळपास चार-पाच महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने २ एप्रिलपासून पंचायत समितीच्या माध्यमातून १० टँकरने त्या ठिकाणी दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. काही वाड्या वस्त्यांवर पाणी पोहोचत नसेल, तर त्या ठिकाणीही काहीतरी उपाययोजना केली जाईल.
- सूर्यकांत परब, सहाय्यक अभियंता, पंचायत समिती, पेण
हक्काचे पाणी कधी मिळणार?
अंबा खोरा प्रकल्पात दरवर्षी १३५ दशलक्ष घनलिटर पाणी शिल्लक राहते. याचा वापर केल्यास खारेपाट विभागातील पाणीटंचाई सहज दूर होवू शकते. अंबा खोर्याच्या डाव्यातीरावरून कुर्डुस येथे आलेल्या कालव्याचे काम ३० वर्षापूर्वी करण्यात आले होते, पण कालव्याची जलवाहिनी गळती लागल्याने पाणी अलिबाग तालुक्यातील कुर्डुसपर्यंत पोहचलेच नाही. आजही कालव्याच्या पाण्यावर शेती करण्याचे शेतकर्याचे स्वप्न अपूर्णच आहे. अंबा खोर्यातून वाया जाणारे पाणी खारेपाटात वळवले तरी येथील टंचाई दूर होण्याबरोबरच हा भाग बारमाही पिकाने सुजलाम सुफलाम होईल.
वितरणाअभावी समुद्रात वाहून जाते पाणी
तालुक्यातील हेटवणे धरणातून सिडकोला दिलेल्या पाण्यातून १४१ दशलक्ष लिटर पाणी शिल्लक आहे. हे पाणी अरबी समुद्रात सोडून दिले जातो. या पाण्यावर पेण तालुक्यातील साधारण साडेपाच हजार हेक्टर शेती पिकू शकते. खारेपाटात वर्षातील सहा महिने पाणीटंचाई जाणवते. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त पाणीटंचाईचा भाग असतानाही सरकारकडून नागरिकांच्या हक्काचे पाणी देण्यासही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
भूगर्भातील पाणीपातळीही खालावली
पेण तालुक्यातील भूजल पातळी ५५ मीटर आहे. सिंचनाचे मोठे प्रकल्प रायगड जिल्ह्यात नसल्याने विहिरी, बोअरवेल यांच्यवर अवलंबून राहावे लागते. पाणीपुरवठा विभागात केवळ १३ हजार ३५३ बोअरवेलची नोंद आहे. तर परवानगी न खोदलेल्या बोअरवेलची संख्या ३५ ते ४० हजाराच्या आसपास आहे. भूगर्भातील पाणी साठा वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना, पाणी आडवा, पाणी जिरवा, जलसंधारणच्या योजना दरवर्षी राबवल्या जातात; पण पाण्याची पातळी मात्र वाढलेली नाही.
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष तर कंपनीवर मेहरबानी
गेल्या ३३ वर्षांपासून श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून पाण्यासाठी मोर्चे, आंदोलने करूनही अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड, खारेपाट परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी साठी अंबा खोऱ्याचे पाणी मिळालेले नाही, मात्र दुसरीकडे अंबा खोरे प्रकल्पाने जेएसडब्लू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासाठी ४६.६६ दशलक्ष लिटर प्रति दिन पाणी पुरवठा करण्यासाठी २०१६ ते २०२२ पर्यंत करारनामा केल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी मिळविलेल्या कागदपत्रांवरून उघड झाली आहे. हे पत्र जेएसडब्लू कंपनीने केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडे जो प्रस्ताव सादर केला आहे, त्यासाठी सादर केले गेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.