ठाण्यात पुन्हा कचरा पेटला

ठाण्यात पुन्हा कचरा पेटला
Published on

ठाण्यात पुन्हा कचरा पेटला
गायमुख डम्पिंग ग्राउंडला आग; धुराच्या प्रचंड लोटाने परिसर काळवंडला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : कचरा कोंडीने ठाण्याची घुसमट होत असतानाच पुन्हा एकदा कचऱ्याने पेट घेतला आहे. गायमुख येथील पालिकेच्या कचरा संकलन केंद्राला मंगळवारी (ता. ८) रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप मोठे होते. आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. डम्पिंग ग्राउंडच्या आत जिथे आगीची तीव्रता अधिक होती, तिथपर्यंत अग्निशमन दलाची वाहने पोहोचवण्यास अडचणी निर्माण होत होत्या. मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणण्यात आले. त्यानंतर धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले आहेत.

कचऱ्यावरून ठाणे महापालिका प्रशासन कोंडीत सापडले आहे. सी. पी. तलाव संकलन केंद्राला सलग दोन वेळा आग लागल्यानंतर कचराप्रश्न अधिक चिघळला आहे. डायघर प्रकल्प अपुरा पडत आहे. त्यात सरकारने दिलेला आतकोली कचरा प्रकल्प रोज विरोधामुळे वादात सापडत आहे. सध्या या ठिकाणी पालिकेने कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे, पण तरीही कचरा संकलित करण्यासाठी जागा मिळत नसल्याने पालिका हतबल झाली आहे. त्यातच आता गायमुख डम्पिंगलाही आग लागल्याने पालिकेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. घोडबंदर परिसरातील कचरा गोळा करून तो जुना जकात नाका येथील गायमुख संकलन भूमीवर टाकला जात आहे. ही जागा पालिकेने डम्पिंगसाठी आरक्षित केली असली तरी ती वन विभागाच्या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येते. त्यामुळे हे डम्पिंग बेकायदा असल्याची याचिका काही महिन्यांपूर्वी दाखल केली होती. त्यावरून हरित लवादानेही पालिकेला फटकारले होते.

गायमुख परिसरात कचरा टाकला जाऊ नये, यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पालिकेशी पत्रव्यवहार केला होता, पण सध्या कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पालिकेने गायमुख संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणात डम्पर रिकामी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या संकलन केंद्राचे रूपांतर डम्पिंगमध्ये होऊन येथे कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत. जंगल परिसर असल्याने येथे ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे मिळेल त्या जागेवर कचरा टाकण्यात येत आहे. अशातच मंगळवारी रात्री सुमारे साडेआठच्या दरम्यान आग लागल्याचे निदर्शनास आले. बाळकूम अग्निशमन केंद्राला याची माहिती मिळताच पथक एक फायर वाहन आणि येस्क्यू वाहनासह घटनास्थळी रवाना झाले. पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारीही पिकअप वाहनासह पोहोचले. त्याआधीच वन विभागाचे कर्मचारी तेथे उपस्थित होते. डम्पिंग ग्राउंडच्या आतील भागात आग लागल्याने तिथे वाहने पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले असले तरी अजूनही ती पूर्णपणे नियंत्रणात येण्यात अपयश आल्याचे कळते. दरम्यान, यासर्व प्रकारामुळे डम्पिंग परिरसरात प्रचंड धुराचे लोट पसरले आहेत.

जंगल संपदेला धोका
घोडबंदर येथील गायमुख भागात संजय गांधी उद्यानाचा परिसर येतो. हा परिसर इको-सेन्सिटिव्ह झोन आणि बफर क्षेत्रात येतो. या यभागात पालिकेकडून कचरा टाकण्यात येत असल्यामुळे सर्व नियम आणि कायदे कचरापेटीत टाकले जात आहेत. कचऱ्यामुळे नैसर्गिक जंगल संपदेला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी याआधीही केला होता, पण आता या आगीमुळे हा धोका आणखी वाढला आहे.

संशयाचा धूर
सी. पी. तलाव संकलन केंद्राला लागलेली आग संशयाच्या घेऱ्यात असतानाच गायमुख येथेही तशाच पद्धतीने आग लागल्यामुळे पुन्हा एकदा संशयाचा धूर पसरला आहे. वास्तविक आपल्या भागात कचरा संकलन किंवा डम्पिंग नको, असा सूर सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनी लावला आहे; मात्र प्रशासनाकडे सध्या कोणताही ठोस पर्याय नसल्याने संकलन केंद्र सुरू ठेवणे अपरिहार्य आहे. त्यातूनच या आगीच्या घटना वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com