

अंबरनाथ, ता. ९ (बातमीदार) : शहरातील उद्याने, रस्ते आणि ग्रंथालयासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने २० कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यात पूर्व, पश्चिम भागातील दोन उद्याने, पश्चिमेतील रस्ता, संयुक्त अग्निशमन केंद्र अशा विविध कामांचा समावेश आहे. या कामांमुळे अंबरनाथमधील उद्यानांचे अद्ययावतीकरण करणे सोपे होणार आहे.
शहरात नागरिकांना विरंगुळ्याची विविध केंद्र उपलब्ध व्हावीत, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ पूर्वेतील पं. नेहरू उद्यान दर्जेदार पद्धतीने विकसित झाले आहे. आज दररोज शेकडो नागरिक या उद्यानाचा लाभ घेतात. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नगरोत्थान महाअभियानातून अंबरनाथ शहरासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करत त्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले. त्यांच्या याच प्रयत्नामुळे अंबरनाथ शहरासाठी तब्बल २० कोटी ५१ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.
चार उद्यानांचा विकास
अंबरनाथ पूर्वेतील साई सेक्शन परिसरात असलेल्या उद्यानासाठी तीन कोटी ७१ लाख ५९ हजार मंजूर झाले आहेत. तर पश्चिम भागातील शंकर हाईट्स येथील उद्यानाच्या अद्ययावतीकरणासाठी तीन कोटी ७४ लाख ९९ हजार मंजूर केले आहेत. अंबरनाथच्या मध्यवर्ती भागातील मधु मंगेश कर्णिक उद्यानात ग्रंथालय उभारण्याच्या कामासाठी एक कोटी २३ लाख ६८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. त्याच वेळी पश्चिमेतील सर्वोदयनगर येथील आरक्षण क्र. ८७ वर उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे अंबरनाथ शहरातील चार उद्याने वेगळ्या अर्थाने विकसित होणार आहेत.
रस्ते सुसाट
अंबरनाथ पश्चिमेतील वाधवा कॉम्प्लेक्स ते नाना पाटील चौक हा रस्ता वर्दळीचा आणि महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून दोन कोटी ९९ लाख ४१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अग्निशमन यंत्रणा सक्षम होणार
अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांच्या संयुक्त अग्निशमन केंद्रासह ७० एएलपी वाहने उभी करण्यासाठी केंद्र व निवास व्यवस्था उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी दोन कोटी ७२ लाख ५६ हजार मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
स्मशानभूमीसाठी तरतूद
जांभिवली गाव व जांभिवली पाडा येथील हिंदू स्मशानभूमीचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी ४२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सांस्कृतिक केंद्र
अंबरनाथ पश्चिमेतील मदनसिंग मनवीर सिंग उद्यान, वुलन चाळ येथे बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल दोन कोटी ६१ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या परिसरातील महिला, युवकांना या बहुद्देशीय सभागृहाचा मोठा फायदा होणार आहे. हे भविष्यातील सांस्कृतिक केंद्र ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.