

सावरोली-खारपाडा राज्य मार्गावर खोदाई
अपघात होण्याची शक्यता; सार्वजनिक बांधकाम विभाग अंधारात
खालापूर, ता. ९ (बातमीदार) ः वाहतुकीसाठी व्यस्त असलेला सावरोली- खारपाडा राज्य मार्गावर सध्या विविध कारणांनी संबंधित स्थानिक प्रशासनाकडून वारंवार खोदकाम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता अतिधोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र याबाबत कोणतीही कल्पना न देता हे खोदकाम करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा निष्काळजी वृत्तीमुळे प्रवाशांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.
सावरोली-खारपाडा राज्य मार्गावर खालापूर हद्दीत कुंभिवली गावानजीक दोन ठिकाणी जलवाहिनीसाठी रस्ता खोदण्यात आला आहे. सहा फूट खोल आणि साधारण चार फूट रुंदीचा खड्डा खोदण्यात आला असून, त्याची माती रस्त्यावर ठेवण्यात आली आहे. या मातीवरून दुचाकी घसरून पडण्याची भीती वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील याच ठिकाणी तीन वेळा राज्य मार्ग खोदण्यात आला होता. कुंभिवली ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने हा रस्ता खोदण्यात येत आहे, मात्र जलवाहिनीसाठी खोदकाम करताना सुरक्षेचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात येत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षे सावरोली-खारपाडा राज्य मार्ग दुरुस्ती अभावी रखडला होता. त्यानंतर अनेक तक्रारी वाढल्यानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागले होते. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, मात्र आता या मार्गावर वारंवार खोदाई होत असल्याने पुन्हा रस्ता कमकुवत झाला असून, तो धोकादायकदेखील बनला आहे. त्यामुळे विनापरवानगी रस्ता खोदकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
....................
सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. या ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार यांनी दिली.
.......................
पेणमध्ये शहरातील रस्ते खड्डेमय
पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्याची मागणी
पेण, ता. ९ (वार्ताहर) : पेण शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, सगळीकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करावी, अशी मागणी पेण शहरातील नागरिक करीत आहेत.
शहरात बऱ्याच खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या पाइपलाइनच्या कामांमुळे विविध ठिकाणी खोदकाम सुरू आहे. त्याचा त्रास नागरिकांना वारंवार सहन करावा लागत असून, शहरातील मुख्य रस्ता, चिंचपाडा, कोंबडपाडा, देवआळी, कुंभार आळी, बाजारपेठ यासह इतरही रस्त्यावर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे, तर कुंभार आळी येथील मारुती मंदिर आणि आंबा माता मंदिर परिसरातील रस्त्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून गाडी चालविणे त्रासदायक झाले आहे. नागरिकांनादेखील चालताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने स्कूल बस आणि इतर शालेय गाड्यांची रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी येथील रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी पेणमधील नागरिक करीत आहेत.
....................
पेण शहरात सध्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे काम सुरू आहे, मात्र चांगले रस्ते फोडून दुरुस्तीचे काम कासवगतीने केले जात असल्याने येथे सकाळ, संध्याकाळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
-समीर म्हात्रे, तालुकाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.