

स्कायवॉकवर मद्यपी, गर्दुल्ल्यांचा अड्डा
महिलांसाठी स्कायवॉक असुरक्षित
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकालगत असलेल्या स्कायवॉकवर अवैध देहव्यापार, गुटखा विक्रीच्या साथीलाच आता मद्यपी, गर्दुल्ल्यांनी अड्डा बनवला आहे. तसेच, अनेक बेघर नागरिकांनी आपल्या सर्व सामानासहीत स्कायवॉकवरच निवारा थाटला आहे. याचा त्रास कल्याणमधल्या नोकरदारांवर आणि विशेषतः महिलांवर होत आहे.
अवैधरीत्या सुरू असलेल्या देहव्यापारामुळे कुप्रसिद्धी पावलेला कल्याणचा स्कायवॉक आता अधिकाधिक कुप्रसिद्ध होत आहे. फेरीवाल्यांनी स्कायवॉकवर बस्तान बसवल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ इथे अनेक अवैध धंदे सुरू झाले. देहव्यापार, बंदी असलेला पान मसाला, गुटखा विक्री आणि आता यात मद्यपी, गर्दुल्ले यांची भर पडली आहे. मंगळवारी (ता. ८) रोजी भर दुपारी दारूच्या बाटल्या उघडून इथे मद्यपानाला बसलेले दिसून आले. त्यांना एका प्रवाशाने हटकण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यापैकी एकाने आक्रमक होण्याचा प्रकार केला. अखेर तो प्रवासी निमूट आपल्या मार्गाने चालू लागला. तर, या मद्यपींच्या विरुद्ध बाजूला काही बेघर नागरिकांनी आपले बरेच सामान आणून तिथे निवारा थाटल्याचे दिसले. स्कायवॉकवर येणाऱ्या- जाणाऱ्यांपैकी कुणीतरी त्रास दिल्याने या बेघरांपैकी एक वृद्ध महिला आक्रोश करून रडताना दिसून आली; मात्र तिची परिस्थिती पाहण्यासाठी तिथे कुणीच नव्हतं. तिचे हाल बघताना अनेक पादचारी हेलावून गेल्याचे दिसून आले. तर, रेल्वेस्थानकातून स्कायवॉकवर प्रवेश करून थोडं पुढे येऊन डावीकडे वळल्यावर अवैध गुटखा विक्रेता गुटखा, पान मसाला विकण्यास बसतो. त्याच्याकडून गुटखा घेऊन स्कायवॉकचा परिसर अनेकांनी थुंकून लाल केल्याचे दिसते आहे.
‘त्या’ नजरांचा महिलांना त्रास
दुर्दैवाने या सगळ्याचा नाहक व मानसिक त्रास हा कल्याणच्या नागरिकांना आणि त्यातही कल्याण पश्चिमेकडे येणाऱ्या, राहणाऱ्या तरुणींना, महिलांना होतो. कारण देहव्यापार करणाऱ्या वारांगनांच्या अवती-भोवती अनेक पुरुष इथे दिवस-रात्र घुटमळत असतात. त्यांच्या नजरांचा सामना दुर्दैवाने तिथून जाणाऱ्या इतरही महिलांना, महाविद्यालयीन तरुणींना करावा लागतो. त्यात, मद्यपी आणि गर्दुल्ल्यांच्या वावरामुळे स्कायवॉकवर असुरक्षित वाटत असल्याचे एका महिलेने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. स्कॉयवॉकच्या खालून चालताना मोठ्या प्रमाणात रिक्षांची वाहतूक होते, त्यामुळे तिथून चालणे अवघड झाल्याने अनेक महिला अखेर स्कायवॉकचा असुरक्षित मार्ग स्वीकारतात.
पोलिस आणि महापालिका गाढ झोपेत
स्कायवॉकवरील या परिस्थितीबद्दल सीसीटीव्हींमुळे अनभिज्ञ नसतानाही महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस शांत असल्याचा आरोप स्कायवॉकवरून येणाऱ्या- जाणाऱ्या महिला करीत आहेत. मध्यंतरी या स्कायवॉकवरील तीन महिलांची देहव्यापारातून सुटका केली गेली होती. यात दोघांना अटकही झाली होती; मात्र यानंतर या देहव्यापाराला आळा बसेल, अशी शक्यता होती; परंतु अजूनही वारांगना तिथे उभ्या असल्याचे दिसून येते. महापालिकेने काही दिवसांपूर्वी स्कायवॉकखालील फेरीवाल्यांवर कारवाई केली होती; मात्र अजूनही महापालिकेला स्कायवॉकवर दोन जिने चढून येण्यास वेळ नसल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.