पालिका शाळांना सुरक्षाकवच

पालिका शाळांना सुरक्षाकवच
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : बदलापूर येथील शाळेत घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी सुरक्षारक्षकांचीदेखील नेमणूक करण्यात येत आहे. याच अनुषंगाने ठाणे महापालिका प्रशासनाच्या १२९ शाळांमध्ये ९५० सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रियादेखील राबविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. अशातच शाळांमध्ये घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा बसावा, यासाठी सर्वच शालेय प्रशासन व संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ठाणे पालिका प्रशासनानेदेखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या ७७ इमारतींमध्ये १०६ प्राथमिक आणि २३ माध्यमिक अशा एकूण १२९ शाळा असून त्याठिकाणी २८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची प्रवेशद्वारे आणि बाहेर जाण्याच्या मार्गाबरोबर शौचालयाच्या परिसरात बाहेरील ठिकाणी, मैदान, व्हरांडा, पॅसेज, जिन्यावर कॅमेरे महापालिकेकडून बसवले जाणार आहेत.
----------------------------------------------
अनुचित प्रकार टाळण्याचा प्रयत्न
शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडणाऱ्या चुकीच्या घटनांबाबत राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्या माध्यमातून शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून आता ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण हे शाळेतील मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com