

सुक्या मासळीच्या बेगमीला सुरुवात
शहरात अनेक ठिकाणी वाळवण; नवी मुंबईकरांकडून पावसाळ्यासाठी खरेदी
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) ः नवी मुंबईत सुक्या मासळीच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ओली मासळी वाळवून व्यवस्थित त्याची पावसाळ्यासाठी बेगमी केली जात आहे. नवी मुंबईतील खाडीकिनारी तसेच शहरासह कोळीवाड्यात अशा प्रकारे विविध प्रकारच्या मासळी वाळविताना दिसून येत आहे.
पावसाळ्यात खोल समुद्रात मासेमारीला बंदी असल्याने समुद्रातील मासळी मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने मांसाहारप्रेमींना सुक्या मासळीवरच ताव मारावा लागतो. यासाठी उन्हाळी वाळवणाच्या कामात सुक्या मासळीची बेगमीदेखील खूप महत्त्वाची समजली जाते. नवी मुंबई हा समुद्र व खाडीकिनारपट्टी जवळील परिसर असल्यामुळे येथे अनेक कोळीबांधव घरगुती स्वरूपात मासळी सुकवून त्याची बेगमी करताना दिसून येते. शहरातील दिवाळे, करावे, सारसोळे, वाशी, तसेच ऐरोलीपर्यंत मासेमारी करणारा वर्ग आजही उन्हाळ्यात मासळी सुकविण्याची कामे करताना दिसून येतो. खाडीतून कोळंबी पकडून आणून ती व्यवस्थित वाळवून त्याचा पुढील पाच-सहा महिन्यांसाठी साठा केला जातो. पूर्वी हा साठा मातीच्या बासनात, लाकडी पेटाऱ्यात किंवा मडक्यात केला जाई. त्यामुळे सुकी मासळी व्यवस्थित टिकत होती. सध्याच्या काळात प्लॅस्टिकच्या मोठमोठाल्या पिशव्यांमध्ये ही मासळी साठवली जाते.
.............
भावात वाढ
नवी मुंबई परिसरातील गावोगावी सुक्या मासळीच्या विक्रेत्या मोठ्या प्रमाणात सुका जवळा, सुकट, करंदीपासून केली जाणारी अंबाडी सुकट, वाकट्या, बोंबील, सुकी मांदेली, सुका शिंगाळा, सुका कूपा, खारवलेली सुरमई, सुका खारवट बांगडा अशा प्रकारची मासळी घेऊन फिरताना दिसून येतात. त्यात काही विक्रेत्या उरण, पनवेल भागातील असतात. सुक्या मासळी विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात चांगलाच प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे सुक्या मासळीच्या बाजारातदेखील नागरिक जवळपास दोन ते तीन हजारांचा, तर पाच हजार रुपयांचा पावसाळ्यातील बाजार एकदाच करतात. सध्या कोळंबीचे सोडे अडीचशे रुपये किलाने मिळत आहेत, तर वाकटी व बोंबील किलोमागे दीडशे ते दोनशे रुपये वाढलेले दिसून येतात. अंबाडी सुकट, तेंडली सुकट व बारीक जवळा यांचेदेखील भाव किलोमागे ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.