

कासा, ता. ९ (बातमीदार) : सरकार तारीख पे तारीख देत आहे, पण पाणी मिळत नाही, अशी टीका करत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी (ता. ९) सूर्यानगर येथील एमएमआरडीएच्या सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाची पाहणी केली. सहा महिन्यांत मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मिरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिकांना अद्याप पाणी न मिळाल्यामुळे त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.
पुढील सहा महिन्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि मिरा-भाईंदर शहरांना पाणीपुरवठा सुरू होईल, मात्र शहरांसाठी आरक्षित पाण्यामुळे पालघर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रावर परिणाम झाला असून, त्यावरही शासन योग्य तोडगा काढेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. या प्रकल्पातून मूळत: २१८ एमएलडी पाणी मिरा-भाईंदरला देण्यात येणार होते. काही प्रमाणात पाणी ग्रामीण भागासाठीही नियोजित होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पातून १०० एमएलडी अतिरिक्त पाणीही मिळणार होते. दोन वर्षांपूर्वीच पाणीपुरवठा सुरू होण्याचे ठरले होते, मात्र अद्याप काम प्रलंबित आहे.
पाण्याची टाकी, ३३२ केव्ही वीजमार्गिका व रस्त्याचे काम अपूर्ण आहे. जलवाहिनी अंथरण्याचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे, मात्र प्रकल्पातील पाणी प्रामुख्याने शहरांकडे वळवले जात असल्याने ग्रामीण भागांतील पाणी समस्या गंभीर झाल्या आहेत. याकडे लक्ष वेधल्यावर सरनाईक म्हणाले की, ग्रामीण भागाला पाण्याची टंचाई भासू देणार नाही. त्यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करेल. या दौऱ्यात पालघर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, डहाणू तालुकाप्रमुख संतोष देशमुख, हेमंत धर्ममेहेर सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.